Honey trap Alert : जग इकडंच तिकडं होईल पण पाकिस्तान (Pakistan) काही सरळ मार्गावर येणार नाही. आपल्या प्रत्येक कृतीतून पाकिस्तानने हे वेळोवेळी सिद्ध केलंय. कधी बॉर्डरवर खुरापती तर कधी गुप्तचर पाठवणं, पाकिस्तानसाठी ही नवी गोष्ट नाही. अशातच आता पाकिस्तानने नवं हत्यार उपसलंय. सोशल मीडियाचा (Social Media) वापर आता मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्यात ना भारत मागे, ना पाकिस्तान... अशातच आता पाकिस्तानने सोशल मीडियाचा वापर करत भारताला अडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेने (intelligence agencies) अलर्ट जारी केला आहे.
एक युद्ध तर जिंकता आलं नाही, पण पाकिस्तानने आता नवी खेळी सुरू केली आहे. पंजाबमध्ये तैनात सैनिक, पोलीस कर्मचारी आणि सरकारी अधिकारी यांना हनीट्रॅप (Honey trap) करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी अलीकडेच राज्य पोलीस मुख्यालयाला अलर्ट जारी केला. महिला पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हने (PIO) आता त्यांना हवी असलेली माहिती मिळविण्यासाठी सोशल मीडियावर हनीट्रॅप सुरू केला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांनी अशा 14 सोशल मीडिया प्रोफाइलची यादी जारी केली आहे, ज्याच्या संदर्भात लष्कर आणि पंजाब पोलीस कर्मचाऱ्यांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.
भारतीय लष्कर, नौदल, हवाई दलाचे अधिकारी एवढंच नाही तर त्यांचे नातेवाईक देखील हे प्राथमिक लक्ष्य आहे, ज्यांना सोशल मीडियावर सुंदर महिलाकडून आमिष दाखवलं जातं आणि पाहिजे ती माहिती मिळवली जाते. यासाठी बनावट फोटोचा वापर देखील केला जातो. पंजाब पोलिसांच्या DGP कार्यालयाने अशा 14 संशयास्पद प्रोफाइलची यादी जारी केली आहे. यामध्ये अनिया राजपूत, अलिना गुप्ता, अन्या अन्या, दीपा कुमारी, इशानिका अहिर, मनप्रीत प्रीती, नेहा शर्मा, परीशा अग्रवाल, प्रिया शर्मा, श्वेता कपूर, संगीता दास, तारिका राज, परिशा आणि पूजा अतर सिंग या नावांचा समावेश आहे.
दरम्यान, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या महिला सक्रिय आहेत. एखाद्या व्यक्तीला जाळ्यात अडकवायचं, त्याच्या परिवाराविषयी जाणून घेयचं अन् पाहिजे ती माहिती मिळाली की ब्लॉक करायचं, असा प्रकार पाकड्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे तुमच्याही सोशल मीडिया फॉलोवर्सच्या यादीत ही नावं तर नाहीत ना? याची पडताळणी केली गेली पाहिजे.