PAK च्या माजी लष्करी अधिकाऱ्याला भारतात पद्म पुरस्कार, जाणून घ्या का मिळाला सन्मान?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये एका नावाची सर्वाधिक चर्चा झाली

Updated: Nov 11, 2021, 07:12 PM IST
PAK च्या माजी लष्करी अधिकाऱ्याला भारतात पद्म पुरस्कार, जाणून घ्या का मिळाला सन्मान? title=

मुंबई : पद्म पुरस्कारांचा (Padma Awards) विषय देशात या आठवड्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. पद्म पुरस्कार हा देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशासाठी उल्लेखनीय कार्य करणारे आणि विशिष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान झाला. पद्म पुरस्कार विजेत्यांचे खूप कौतुकही झालं.

एका नावाची सर्वाधिक चर्चा

अनेकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असलं तरी एका नावाची सर्वाधिक चर्चा झाली. हे नाव होतं, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) काझी सज्जाद अली झहीर. ते माजी पाकिस्तानी सैनिक असून त्यांना यावेळी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या पाकिस्तानी सैनिकाची कहाणी अतुलनीय आणि शौर्याने भरलेली आहे. जीव धोक्यात घालून बांगलादेश मुक्त करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

1971 च्या भारत आणि पाकिस्तान युद्धापूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी बांगलादेशात (तत्कालीन पाकिस्तान) उपद्रव माजवला होता. हजारो लोकांची हत्या केली गेली. बांगलादेशात पाकिस्तानविरोधात प्रचंड संताप होता. त्यावेळी कर्नल झहीर यांनी भारतीय जवानांसह पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई सुरु केली. बांगलादेशच्या स्वातंत्र्यापूर्वी कर्नल झहीर हे पाकिस्तानी लष्कराचे मोठे अधिकारी होते, पण पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशच्या जनतेवर इतके अत्याचार केले, की कर्नल झहीरसारख्या लोकांना ते सहन झालं नाही.

पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळून 1921 मध्ये लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद भारतात आले. काझी सज्जाद हे 1971 च्या युद्धातील नायक म्हणून ओळखले जातात. आजही पाकिस्तान त्यांचा शोध घेत आहे. पाकिस्तानात त्यांच्याविरुद्ध डेथ वॉरंट जारी होऊन 50 वर्षे झाली आहेत.

लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद हे सियालकोट सेक्टरमध्ये तैनात असलेले जवान लष्करी अधिकारी होते. तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये जी क्रूरता आणि नरसंहार केला जात होता, त्याने ते व्यथित झाले. त्यांनी तो भाग पाकिस्तानपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला.

या घटनेला बराच कालावधी लोटला. यानंतर लेफ्टनंट कर्नल झहीर यांचं नाव लोकांच्या विस्मृतीत गेलं. पण या आठवड्यात त्यांनी पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर पाऊल टाकलं तेव्हा पुन्हा ते चर्चेत आले. बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान विसरता येणार नाही. ते अनेक बांगलादेशी लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि भारतासाठीही ते महत्वाचे व्यक्ती आहेत.