Pakistan News: भारताविरोधात कटकारस्थानं रचणाऱ्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा एक कावेबाजपणा केल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय संरक्षण यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाकिस्तानकडून हनीट्रॅपचा वापर करत भारताची संरक्षणविषयक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI नं त्यांच्या नापाक मनसुब्यांना पूर्णत्वास नेण्यासाठी थेट आता मुलींच्या नावांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या पाकिस्तानकडून भारतीय मुलींच्या नावांनी बनावट सोशल मीडिया अकाऊंट सुरु केले असून, त्या अकाऊंट्सच्या माध्यमातून भारतीय गुप्तचर यंत्रणा, संरक्षण मंत्रालयाशी संबंधित माहिती आणि तत्सम संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी हा हनीट्रॅपचा सापळा रचण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणांशी संबंधित त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयएसआयनं निवडलेल्या भारतीय नावांच्या अकाऊंटसाठी भारतीय दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. जेणेकरून त्या जेव्हाजेव्हा ते भारतात एखाद्या जवानाला फोन करतील तेव्हा त्या पाकिस्तानच्या हेर असण्याचा संशय कोणालाही येणार नाही.
पाकिस्तानच्या या कटाला उलथून पाडण्यासाठी सध्या भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सर्व Fake Accounts च्या प्रोफाईलची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय मुलींची प्रिशा, नेहा अशी नावं, फोटो आणि त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी संबंधित सोशल मीडिया अकाऊंटबद्दलच्या माहितीचा तपशील तयार करण्यात आला आहे.
Pakistan Intelligence Operative म्हणजेच POI च्या नावानं अनेक मुलींचा वापर पाकिस्तान आयएसआयकडून हेरगिरीसाठी करण्यात येतो. या कटापासून सुरक्षित राहण्यासाठी भारतीय संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि लष्कराकडूनही सतर्क करण्यात आलं आहे. त्यामुळं सोशल मीडियावर एखाद्या संशयास्पद अकाऊंटवरून रिक्वेस्ट आल्यास तातडीनं संबंधित यंत्रांना त्यासंबंधीची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तुम्हालाही सोशल मीडियावर अशी एखादी रिक्वेस्ट आल्यास ती अजिबातच Accept करू नका. कारण हा हनीट्रॅपचा हादरवणारा कट असणार आहे.