नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पी.चिदंबरम यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हा चिदंबरम यांच्यासाठी जोरदार धक्का मानला जात आहे. सीबीआय आणि चिदंबरम यांची बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने आपली सुनावणी राखून ठेवली होती. चिदंबरम दिल्लीतील तिहार जेलमध्ये बंद असून त्यांनी जामीन याचिकेची मागणी केली होती.
वकील कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांच्यावतीने उच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडली. चिदंबरम हे कधीच इंद्राणी मुखर्जीला भेटले नाहीत. तुम्ही व्हिजीटर्स बुक तपासू शकता असेही त्यांनी स्पष्ट केले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे प्रकरण लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने आरोपींची अग्रिम जामीन याचिका फेटाळल्याचे सीबीआयची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले.
२१ ऑगस्ट रोजी पी. चिदंबरम यांना अटक केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या काळात पी. चिदंबरम यांनी जामीनासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ दिली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
पी. चिदंबरम यांना तुरुंगात झोपायला फक्त चटई दिली आहे. त्यांची उशीही काढून घेण्यात आली. चिदंबरम यांना खाली बसताना त्रास होता. यासाठी त्यांनी खुर्ची मागवली होती. मात्र, तीदेखील काढून घेण्यात आली. रोजच्या जेवणात त्यांना पातळ जाळ आणि सुकलेली भाकरी खायला मिळते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. चिदंबरम झाले, डी. के. शिवकुमार झाले, चंद्राबाबू झाले, शरद पवार झाले. उद्या मला ईडीची चौकशी लावून तुरुंगात टाकले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. माझी तयारी आहे, मी घरी तसे सांगून ठेवलेय, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.