बंगळुरू : एमआयएम पक्ष कर्नाटकमध्ये होत असलेल्या निवडणुका लढणार नाही, असं पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केलं आहे. बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप सरकार यावं हेच कर्नाटकच्या हिताचं असल्याचं ओवेसी म्हणाले. १२ मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये एमआयएम जेडीएस (जनता दल सिक्युलर) या पक्षाला पाठिंबा देणार असल्याची घोषणा ओवेसींनी केली.
कर्नाटक निवडणुकांमध्ये जेडीएसला सर्वाधिक जागा मिळाव्या तसंच कुमारस्वामी मुख्यमंत्री व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं ओवेसी म्हणाले. भाजप आणि काँग्रेसनं कर्नाटकच्या मतदारांची निराशा केली आहे, त्यामुळे आम्ही जेडीएसला पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीमध्ये एमआयएम कोणताही उमेदवार उभा करणार नाही. मी कुमारस्वामी यांच्याबरोबर बोललो आहे, अशी प्रतिक्रिया ओवेसींनी दिली आहे.
कर्नाटकची जनता पुन्हा एकदा जेडीएसवर विश्वास दाखवेल, अशी आशा मला आहे. कर्नाटकच्या हितासाठी काँग्रेस आणि भाजपचं सरकार येऊ नये तसंच देशाच्या हितासाठी लोकसभा निवडणुकीवेळीही भाजप-काँग्रेससोडून सरकार यावं, असं ओवेसी म्हणाले.
ओवेसींनी जेडीएसच्या देवेगौडांसोबत जागावाटपाबाबतही चर्चा केली होती पण जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी ही मागणी फेटाळली. उत्तर कर्नाटकातल्या काही जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत एमआयएमनं दिले होते. पण आता निवडणूक न लढवण्याचा आणि जेडीएसला पाठिंबा दिल्याचा निर्णय ओवेसींनी घेतला आहे. यामुळे जेडीएसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एचडी कुमारस्वामी यांना फायदा होऊ शकतो. कुमारस्वामी रामनगरमधून निवडणूक लढणार आहेत. या जिल्ह्यामध्ये व्होकालिगा आणि मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे.