लाहोल स्पीति व्हॅलीत अडकलेल्या 650 हून अधिक जणांची सुखरुप सुटका

या सर्वांना लाहोलच्या शिशु सुरुंगच्या मार्गानं मनालीतील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं

Updated: Sep 27, 2018, 09:32 AM IST
लाहोल स्पीति व्हॅलीत अडकलेल्या 650 हून अधिक जणांची सुखरुप सुटका title=

शिमला : हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पीति जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या जवळपास 672 जणांची सुखरुप सुटका करण्यात सुरक्षायंत्रणेला यश आलंय. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे आणि बर्फामुळे या भागातील रस्ते बंद झाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा रस्ते संघटनेनं (बीआरओ) रस्ते मार्गानं सुरु केलेल्या अभियानात 641 जणांना बाहेर काढण्यात आलंय. या सर्वांना लाहोलच्या शिशु सुरुंगच्या मार्गानं मनालीतील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. यामध्ये, भारतीय वायुसेनेनंही मदतीचा हातभार लावत 31 जणांना हवाई मार्गानं सुरक्षित ठिकाणी हलवलं. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सनं बारालाछा ला आणि स्पीति तहसीलच्या दुसऱ्या भागांत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी उड्डाण घेतलं. वाचवण्यात आलेल्या लोकांना कुल्लू जिल्ह्याच्या धालपूर ग्राऊंडमध्ये एका अस्थायी हेलिपॅडवर उतरवण्यात आलं. 

राज्य आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड-मंडी मार्गसहीत प्रदेशातील 614 बंद झालेल्या रस्त्यांपैंकी काही मार्ग पुन्हा सुरु करण्यात आलेत. अजूनही इथे 40 जण अडकल्याची माहिती मिळतेय.