'Zee हिंदूस्थान' देशातील पहिली 'अॅंकरलेस' वाहिनी - राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा

झी मीडिया समुहाने आपली लोकप्रिय वाहिनी Zee हिंदूस्थान रिलाँच केली आहे.

Updated: Dec 13, 2018, 02:43 PM IST
'Zee हिंदूस्थान' देशातील पहिली 'अॅंकरलेस' वाहिनी - राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा title=

नवी दिल्ली - झी मीडिया समुहाने आपली लोकप्रिय वाहिनी Zee हिंदूस्थान रिलाँच केली आहे. आता या वाहिनीवर कोणताही वृत्तनिवेदक (अॅंकर) असणार नाही. म्हणजे ही वाहिनी देशातील पहिली 'अॅंकरलेस' वृत्त वाहिनी ठरली आहे. चॅनलच्या रिलॉंच निमित्त राज्यसभेतील खासदार डॉ. सुभाष चंद्रा म्हणाले की झी समुहाकडे १३ वृत्तवाहिन्या आहेत. यापैकी अनेक वाहिन्या या वेगवेगळी भाषा आणि प्रांताचे प्रतिनिधित्व करतात. एक अशी वृत्तवाहिनी असावी जी केवळ एक देश, एक बातमी या स्वरुपात काम करेल, असा विचार आम्ही केला. Zee हिंदूस्थान आता याच रुपात काम करेल आणि संपूर्ण देशाला जोडेल.

वृत्तवाहिन्यांचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा करताना डॉ. चंद्रा यांनी सांगितले की, आतापर्यंत कोणतीही वृत्तवाहिनी म्हटली की एका अॅंकरचा चेहरा समोर येतो. त्यामध्ये प्रणव रॉय, विनोद दुआ, रजत शर्मा आणि सुधीर चौधरी या सारख्या अॅंकरचा समावेश होतो.  अॅंकर कितीही निष्पक्ष असला, तरी त्याचे विचार हे बातमीसोबत कायम जोडलेले असतात. त्यामुळे निष्पक्षता कमी होते. निष्पक्षता कायम राहावी, यासाठीच आम्ही आता अॅंकरला वृत्तवाहिनीवरून बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यसभेतील खासदार डॉ. चंद्रा म्हणाले की, यापुढे कॅमेरा थेट आपल्याला कोणतीही बातमी दाखवेल. कॅमेरा कायमच निष्पक्ष असतो. प्रेक्षकांना स्पष्टपणे बातमी समजावी, यासाठी मागून आवाज येत राहिल. पण अॅंकर असणार नाही. अशा स्वरुपाची Zee हिंदूस्थान ही पहिली वृत्तवाहिनी असेल. 

ही वाहिनी रिलॉंच करताना डॉ. चंद्रा म्हणाले की, जे केवळ इंग्रजीमध्ये विचार करत होते आणि बोलत होते. त्याच स्वरुपाचे लोक आतापर्यंत देश चालवत होते. पण यामध्ये एक गोष्ट आपण विसरतो की भारताची निर्मिती ७२ वर्षांपूर्वी झाली असली तरी देशाचा इतिहास ६००० वर्षे जुना आहे. भारताला गौरवशाली परंपरा आणि संस्कृती लाभली आहे. पुस्तकांमध्ये या इतिहासाला जागा मिळालेली नाही. ही वाहिनी आता त्या गौरवशाली परंपरेचा पाने प्रेक्षकांसमोर आणेल. ज्याबद्दल देशातील तरुण पिढीलाही अभिमान वाटेल. कारण हा वर्ग त्या गौरवशाली परंपरेपासून दूर गेलेला आहे. 

नवी पिढी आणि गौरवशाली इतिहास यांना जोडण्याचे काम Zee हिंदूस्थान करेल. ज्यामध्ये आपले प्राचीन ज्ञान-विज्ञान आणि सास्कृतिक विविधता यांनाही सामावून घेतले जाईल. आपल्या देशाला विश्व गुरू म्हणून पुढे आणण्याची जे कल्पना करतात. Zee हिंदूस्थान बघून प्रेक्षकांना याची जाणीव होईल की तसे करणे शक्य आहे.

'एक सूत्र मे बंधा हिंदूस्थान' आणि 'एंकर नहीं अब खबर बोलेगी' या वाक्यांप्रमाणे या वाहिनीवर आता खूप माहिती मिळेल. वाहिनीवरील बुलेटिनची वेळही आता अर्ध्या तासावरून १० मिनिटांपर्यंत कमी करण्यात येईल. या वाहिनीवर आता सर्व प्रकारची माहिती मिळेल आणि ही माहिती भारतीय संदर्भात असेल, असेही डॉ. सुभाष चंद्रा यांनी सांगितले. या स्वरुपाच्या वाहिनीमुळे तमिळी, महाराष्ट्रीयन, गुजराती यासह सगळेच जण भारतीय म्हणून विचार करू लागतील.

ही वाहिनी बघून प्रेक्षकांनी त्यांची प्रतिक्रिया, अभिप्राय नक्की द्यावा, असेही डॉ. चंद्रा यांनी म्हटले आहे. जर प्रेक्षकांना काही उणीव भासत असेल, तर त्याबद्दलही त्यांनी मोकळेपणाने सांगावे.

झी मीडिया समुहाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अशोक वेंकटरमाणी यांनी Zee हिंदूस्थानला शुभेच्छा दिल्या. वृत्तवाहिन्यांवर आता मते जास्त मांडली जाऊ लागली आहेत आणि बातम्या कमी दिसताहेत. लोकांना मतांची नाही तर बातम्यांची गरज आहे. बातम्या बघून लोकं आपली मते तयार करू शकतात. त्यांच्यावर कोणताही विचार लादण्याची गरज नाही. Zee हिंदूस्थानचे मुख्य संपादक पुरुषोत्तम वैष्णव म्हणाले की, या वाहिनीवरून मते आणि विचारसरणी यांना बाजूला करून भारताचा चेहरा नव्याने आम्ही प्रस्थापित करू.