देशाच्या 'या' भागांमध्ये शीत'कहर' वाढणार, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

येते काही दिवस सतर्क रहा 

Updated: Jan 29, 2019, 09:41 AM IST
देशाच्या 'या' भागांमध्ये शीत'कहर' वाढणार, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा title=

शिमला: देशभरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस खाली जात असल्याचं पाहून हवामान खात्याकडून भारताच्या उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि आजूबाजूच्या परिसरात येते काही दिवस मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या दिवसांमध्ये तापमान आणखी निचांक गाठणार असल्याचा सतर्कतेचा इशाराही हवामान खात्यातडून देण्यात आला आहे. 

हिमाचल प्रदेशातील मंडी, शिमला, चंबा, किन्नौर, कुल्लू, लाहौल- स्पिती, कांगडा आणि मंडी या भागांमध्ये हवामान खात्याकडून सतर्कचेता इशारा देण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याचा इशारा हिमाचल प्रदेश आयएमडीचे संचालक मनमोहन सिंग यांनी दिला. 'एएनआय'शी संवाद साधताना त्यांनी याविषयीची माहिती दिली. 

राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळाकडूनही येथील भागात सकर्कतेचा इशारा दिला असून अतिहिमवृष्टी होणाऱ्या भागांमध्ये जाणं टाळण्यास सांगण्यात आलं आहे, शिवाय या परिस्थितीत सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

येत्या काळात कुफरी, मनाली, डलहौसी आणि शिमला येथे तापमान आणखी निचांक गाठणार असल्यामुळे सध्या तेथे अडकलेल्या पर्यटकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. या भागांमध्ये गेले काही दिवस तापमान हे उणे २ अंशांपेक्षाही खाली गेल्यामुळे शीतकहर सुरूच आहे. तर, स्पितीच्या खोऱ्यात तापमानाचा हाच आकडा उणे १५हूनही खाली गेला आहे. फक्त हिमाचल प्रदेशच नव्हे तर, जम्मू- काश्मीर परिसरातही तापमानाने निचांक गाठला असून, परिणामी संपूर्ण देशभरात थंडीची लाट येते काही दिवस कायम राहण्याची चिन्हं आहेत.