मुंबई : मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आतापर्यंत युकेहून (UK) आलेल्या प्रवाशांपैकी एकही व्यक्ती पॉझिटीव्ह सापडलेला नाही. अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे. काल रात्रीपासून युकेहून आलेल्या प्रवाशांपैकी एकही पॉझिटीव्ह व्यक्ती सापडलेली नाही.
काल रात्री आणि आज दिवसभरात मिळून ४ फ्लाईट येणार होत्या. त्यापैरी १ विमान रद्द झाले. ३ विमाने आली आहेत अजून एक विमान आज रात्री येणार आहे. ३ विमानांमधून आतापर्यंत ६०० प्रवासी मुंबईत आले आहेत. आलेल्या सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आलंय. या प्रवाशांची ५ दिवसांनंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येईल. या घडीला आलेल्या प्रवाशांपैकी कुणीही पॉझिटीव्ह नाही.
युकेतून आणि देशांतर्गत प्रवास करणा-या दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथुन विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच बोर्ड करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
युकेहून येणा-या फ्लाईट (UK Flight) आज रात्रीपासून बंद होणार आहेत. शेवटची एकच फ्लाईट रात्री ११ वाजता येण्याची बाकी आहे. मिडल इस्ट आणि वेस्ट युरोप मधून येणा-या प्रवाशांनाही क्वारंटाईन केले जात आहे.
युकेहून ब्रेक जर्नीसाठी देशांतर्गत प्रवास करणारे जे असतील त्यांच्यासाठी त्या त्या राज्यांमधील नियम लागू होतील. दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथुन विमानतळावर येणा-या प्रवाशांकडे निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच बोर्ड करण्याची परवानगी असेल. रिपोर्ट नसल्यास विमानतळावरच टेस्ट केली जाणार आहे.
ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांव्यतिरिक्त इतर युरोप आणि मिडल ईस्ट मधूनही जे प्रवासी येतायेत त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. सेव्हन हिल्स आणि जिटी हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात येते आहे.