नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेबाबत आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. प्लाझ्मा थेरपीवरून आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उलट मत व्यक्त केलं आहे. कोरोनाच्या इलाजासाठी प्लाझ्मा थेरपीसोबतच इतर कोणतीही थेरपी स्वीकृत नसल्याचं अग्रवाल म्हणाले.
'कोरोनाच्या उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायल सुरू आहेत. संपूर्ण जगात कोरोनासाठी परिपूर्ण अशी थेरपी नाही. प्लाझ्मा थेरपीचे अजून प्रयोगच सुरू आहेत. प्लाझ्मा थेरपीच कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी आहे, याचं कोणतंही प्रमाण अजूनतरी बघायला मिळालेलं नाही,' अशी प्रतिक्रिया लव अग्रवाल यांनी दिली.
'आयसीएमआरकडून प्लाझ्मा थेरपीच्या कार्यक्षमतेचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. आयसीएमआरचा अंतिम अहवाल आणि ठोस वैज्ञानिक प्रमाण समोर येत नाही, तोपर्यंत ही थेरपी परिपूर्ण आहे, असं सांगता येणार नाही. या थेरपीचा वापर फक्त रिसर्चसाठीच केला गेला पाहिजे. जर प्लाझ्मा थेरपी गाईडलाईन्सनुसार करण्यात आली नाही तर यामध्ये रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो,' असा गंभीर इशाराही लव अग्रवाल यांनी दिला.
दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात ४ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात आला. या चारही रुग्णांवर झालेले परिणाम सकारात्मक होते, असं अरविंद केजरीवाल म्हणाले होते. तसंच प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या रुग्णांसाठी यशस्वी ठरल्याचा दावा दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केला होता.