मला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरायचं नाही- गडकरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गडकरी यांना भक्कम पाठिंबा

Updated: Dec 21, 2018, 07:51 AM IST
मला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरायचं नाही- गडकरी title=

नवी दिल्ली: मी सध्या आहे त्याठिकाणी आनंदी आहे. त्यामुळे २०१९ साली मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याची कोणतीही शक्यता नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात २०१९ साली भाजपच्या नेतृत्वाची धुरा नितीन गडकरी यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गडकरी यांना भक्कम पाठिंबा असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, गडकरी यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. त्यांनी म्हटले की, हे शक्यच नाही. मी सध्या आहे त्याठिकाणी खूप आनंदी आहे. सध्या गंगा शुद्धीकरण हा माझ्यासाठी सर्वात प्राधान्याचा मुद्दा आहे. तसेच मला चार धाम आणि भारताला इतर देशांशी जोडणारे द्रुतगती महामार्ग उभारायचे आहेत. हे काम करताना मला आनंद वाटतो आणि ते मला पूर्ण करायचे असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 
 
 यावेळी गडकरी यांनी देशात उदयाला येत असलेल्या महाआघाडीवरही भाष्य केले. विरोधी पक्ष केवळ नाईलाजापोटी एकत्र येत आहेत. अशा आघाड्या असल्या की तडजोड, अपरिहार्यता आणि मर्यादाही ओघाने आल्याच. मुळात राजकारण हाच तडजोड आणि मर्यादांचा खेळ आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या पक्षाला आपण प्रतिस्पर्ध्याला हरवू शकत नाही, असे वाटते, तेव्हा ते युती करतात. मात्र, आघाड्या या कधीही आनंदाने तयार होत नाहीत, तर त्यामागे अपरिहार्यता असते. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या भीतीमुळेच इतके दिवस एकमेकांना टाळणारे पक्ष एकत्र आल्याचे गडकरी यांनी म्हटले. 

तसेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, असे मला वाटत नाही. कारण, काँग्रेस आणि भाजपमध्ये थोड्याच जागांचे अंतर आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत आम्ही या त्रुटी हेरून त्यादृष्टीने काम करु. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच विजयी होईल आणि मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.