निसर्ग चक्रीयवादळाचा धोका वाढला, लोकांना सुरक्षित स्थळी हवलण्याचं काम सुरु

किनारपट्टी भागात निसर्ग या चक्रीवादळाचा धोका वाढला 

Updated: Jun 2, 2020, 06:05 PM IST
निसर्ग चक्रीयवादळाचा धोका वाढला, लोकांना सुरक्षित स्थळी हवलण्याचं काम सुरु title=

मुंबई : बंगाल आणि ओडिशा येथे अम्फान चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात निसर्ग या चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटलं की, अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं आहे. त्यामुळे तयार झालेल्या या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हरिहेश्वर आणि दमण दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर 3 जूनपर्यंत जाणवू शकतो.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याचा वेग ताशी 11 किलोमीटर आहे. परंतु हे वादळ परिस्थिती बदलताच ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने वाहू शकतात. मुंबईपासून 430 किमी अंतरावर सध्या हे वादळ आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील किनारपट्टी रिकामे करण्यात आले आहे. नडीआरएफचे पथक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेत आहेत. महाराष्ट्रात या वादळामुळे, जोरदार वारे वाहू शकतात आणि बहुतांश भागात पाऊस पडू शकतो.

गुजरात आणि महाराष्ट्रात तटरक्षक दल आणि एनडीआरएफ सतर्कतेत आहेत. मच्छीमारांना समुद्रकिनार्‍याजवळ जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच लोकांना घराबाहेर पडू नये असा सल्लाही देण्यात येत आहे. हवामान खात्याने दोन्ही राज्यात 48 तासाचा रेड अलर्ट जारी केला आहे. निसर्ग या चक्रीयवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गुजरात सरकारने किनारपट्टी भागात एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत.

दोन्ही राज्यांमधील एनडीआरएफचे पथके वादळाचा सामना करण्यास सज्ज आहेत. महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, मुंबईत 3 आणि पालघरमध्ये 2 तुकड्या आहेत. तर 2 तुकड्या रायगडमध्ये तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई येथे एनडीआरएफची प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय 4 तुकड्या स्टँडबाईवर ठेवण्यात आले आहेत.

याशिवाय गुजरातमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे होणाऱ्या नुकसानीच्या शक्यतेमुळे भावनगर आणि अमरेलीसह किनाऱ्या लगतच्या जिल्ह्यांना उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारी भागात एनडीआरएफच्या 10 आणि एसडीआरएफच्या 5 तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही तुकड्या स्टँडबायवर आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांसह एनडीआरएफचे पथक या जिल्ह्यांच्या किनारपट्टीच्या भागांचे सर्वेक्षण करीत आहेत.

निसर्ग चक्रीवादळासंदर्भात सूरतला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून एनडीआरएफची एक तुकडी येथे तैनात आहे. किनारपट्टी लगतच्या 32 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मच्छिमारांना 4 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र व गुजरातमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने मच्छीमारांना नौका समुद्री किनाऱ्यावर बांधण्याचा सल्ला दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही मच्छिमारांना समुद्राच्या किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. याशिवाय पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांना विद्युत खांब किंवा झाडांजवळ उभे राहू नका असे सांगण्यात येत आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारची अफवा टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.