राहुल गांधींनी मजुरांची बॅग घेऊन चालायला हवे होते- निर्मला सीतारामन

राहुल गांधी यांनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला. उलट त्यांनी मजुरांच्या बॅगा उचलून काहीवेळ चालायला हवे होते

Updated: May 17, 2020, 04:55 PM IST
राहुल गांधींनी मजुरांची बॅग घेऊन चालायला हवे होते- निर्मला सीतारामन title=

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मजुरांची भेट घेणे ही निव्वळ नाटकीपणा Dramabaazi असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्या रविवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला. उलट त्यांनी मजुरांच्या बॅगा उचलून काहीवेळ चालायला हवे होते, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले.

राहुल गांधींची पायी चालत निघालेल्या मजुरांशी 'मन की बात'

यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेसने अधिक जबाबदारीने वागले पाहिजे, असे सीतारामन यांनी सांगितले. काँग्रेसशासित राज्यांकडून मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी जादा रेल्वेगाड्यांची मागणी करण्यात आली आहे आणि ते आम्हाला ड्रामेबाज म्हणतात. मग कालचा प्रकार काय होता? राहुल गांधी यांनी मजुरांची भेट घेणे हा निव्वळ नाटकीपणा होता, अशी टीका सीतारामन यांनी केली.

'माझा मुलगा अपंग आहे, मला बरेलीला जायचेय; माफ करा तुमची सायकल चोरतोय'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरत गावाकडे पायी चालत निघालेल्या मजुरांशी संवाद साधला होता. देशातील इतर शहरी भागांप्रमाणेच रोजगार न उरल्यामुळे दिल्लीतील मजूरही आपापल्या गावी परतत आहेत. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सुखदेव विहार उड्डाणपुलाच्या परिसरातून चालत जात असलेल्या मजुरांशी संवाद साधला. यावेळी काही मजूर विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसून होते. याठिकाणी आल्यानंतर राहुल गांधीही त्यांच्यासोबत फुटपाथवर बसले. यावेळी मजुरांनी आपल्या व्यथा मोकळेपणाने राहुल यांच्यासमोर मांडल्या. या चर्चेनंतर  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी कारची सोयही करून दिली होती.