GST Council Meet | GST परिषदेत मोठा निर्णय, घरातील 'या' वस्तू होणार महाग

पापडापासून ते सौरऊर्जेच्या वस्तूंपर्यंत पाहा कोणत्या वस्तूंमुळे तुमच्या खिशाला बसणार मोठी झळ

Updated: Jun 30, 2022, 10:20 AM IST
GST Council Meet | GST परिषदेत मोठा निर्णय, घरातील 'या' वस्तू होणार महाग title=

नवी दिल्ली : GST परिषदेच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याचा परिणाम थेट सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर होणार आहे. वाढत्या महागाईत आणखी फटका सर्वसामान्य माणसाला बसणार आहे. याचं कारण म्हणजे GST परिषदेत आणखी काही गोष्टींच्या किंमतींवरील स्लॅब वाढवण्यात आला आहे. 

GST परिषदेत झालेल्या निर्णयानुसार आता पॅकेट फूडमधील गव्हाचं पीठ, पापड, पनीर, दही, ताक या वस्तूंवर 5 टक्के टॅक्स लागणार आहे. नवीन टॅक्स स्लॅब हे 18 जुलैपासून संपूर्ण देशात लागू होणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.  

GST परिषदेने कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि घोड्यांच्या शर्यतींवरील अहवाल पुनर्विचारासाठी पाठवला आहे. या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात GST परिषदेची पुन्हा बैठक होणार असल्याचं सांगितलं आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, जीएसटी परिषदेची पुढील बैठक ऑगस्टमध्ये मदुराई, तामिळनाडूमध्ये होईल.

कोणत्या गोष्टींचे दर वाढले
पॅक असलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, मखाणा, सोयाबीन, मटार इत्यादी उत्पादनांवर आता 5 टक्के GST लागणार आहे.
चेकसाठी आता 18 टक्के GST लावण्यात येणार आहे.
नकाशे आणी चार्टवर 12 टक्के GST असेल
1000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी दिवसाचं भाडं असलेल्या हॉटेलसाठी 12 टक्के GST लागणार आहे. 
रुग्णालयात 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या खोल्यांसाठी 5 टक्के GST लागेल.
प्रिंटिंग/ड्रॉइंग इंक', शार्प नाइफ, पेपर कटिंग सुरी आणि 'पेन्सिल शार्पनर', एलईडी लँप, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादनांवर जीएसटी 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या हिटरवर 12 टक्के GST असेल जो आधी 5 टक्के एवढाच होता. 
रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि स्मशानभूमीसाठी जारी केलेल्या करारांवर आता 18 टक्के GST लागणार आहे. जो यापूर्वी 12 टक्के होता.