विमान प्रवास सुरु झाला तरी ८० वर्षांवरील वृद्धांना प्रवासबंदी

विमान प्रवास सुरु करण्याआधी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Updated: May 12, 2020, 07:36 PM IST
विमान प्रवास सुरु झाला तरी ८० वर्षांवरील वृद्धांना प्रवासबंदी title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : नागरी उड्डाण मंत्रालयाकडून विमान प्रवास सुरु करण्याआधी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 80 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय प्रवाशांना केबिनमध्ये कोणत्याही प्रकारच्या बॅगसह प्रवास करता येणार नाही. चेक इन बॅग केवळ एक असेल, ज्याचं वजन 20 किलोपेक्षा कमी असेल.

मंत्रालयाने सध्या डीजीसीए, विमान कंपन्या, विमानतळ ऑपरेटर इत्यादी विमान प्रवासाशी संबंधित असलेल्या, सर्व संबंधितांना एक Standard Operating Procedure पाठविली आहे. या Standard Operating Procedureनुसार, सर्व विमान कर्मचारी आणि विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणं गरजेचं असणार आहे. जर एखाद्या प्रवाशाला कोरोनाची लक्षणं आढळली किंवा आरोग्य सेतू ऍपकडून त्याला ग्रीन दर्शवण्यात न आल्यास, त्याला विमानतळावर प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यापूर्वी मंत्रालयाने Standard Operating Procedure पाठविला आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर विमान प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. परंतु यासाठी विमान कर्मचारी आणि प्रवाशांना अनेक नियम पाळावे लागणार आहेत.

प्रवाशांना दोन तास आधी विमानतळावर पोहचावं लागणार आहे. त्याशिवाय वेब चेक-इन आणि विमानतळावर जाण्यापूर्वी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्याबाबतही आदेश देण्यात आले आहेत. विमानतळावर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.