'हा' परवाना नसल्यास लक्षद्वीपमध्ये पाय ठेवण्याचीही परवानगी नाही

Lakshadweep Travel : जो व्यक्ती मूळचा लक्षद्वीपचा रहिवासी नाही, त्यांच्यासाठी हा परवाना लागू आहे. लक्षद्वीप पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सायली पाटील | Updated: Jan 10, 2024, 12:24 PM IST
'हा' परवाना नसल्यास लक्षद्वीपमध्ये पाय ठेवण्याचीही परवानगी नाही title=
necessary permits required for Lakshadweep Travel latest updates

Lakshadweep Travel : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाला भेट दिली. इथं त्यांच्या लक्षद्वीप भेटीदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, तर तिथे मालदीव (Maldives) विरुद्ध लक्षद्वीप अशा वादानंही याच माध्यमातून डोकं वर काढलं. बस्स, मग काय? त्या क्षणापासून मालदीवपेक्षा लक्षद्वीप किती उत्तम, किंवा भारतातील इतर समुद्रकिनारी प्रदेश किती सुरेख आहे हेच नेटकरी, अनेक सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियावर सांगताना दिसते. 

काही फोटोंपासून सुरु झालेली लक्षद्वीपची चर्चा या केंद्रशासित प्रदेशाच्या नावापासून त्याचा इतिहास, तेथील संस्कृती आणि इतर गोष्टींपर्यंत पोहोचली आणि आता अनेकांनीच या ठिकाणी भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. इतकंच काय, तर काही मंडळींनी तिथं जायची तयारीसुद्धा केली आहे. पण, तुम्हाला माहितीये का भारताचा भाग असूनही लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रवेश करण्यासाठी काही परवाने सोबत बाळगणं अतिशय महत्त्वाचं असतं. 

मासेमारी आणि नारळ विक्री असे मुख्य उद्योग आणि गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनामुळं प्रकाशझोतात आलेल्या लक्षद्वीपमध्ये प्रवेश करण्यासाठी नेमके कोणते परवाने अनिवार्य आहेत माहितीये? 

जो व्यक्ती मूळचा लक्षद्वीपचा रहिवासी नाही, त्यांच्यासाठी हा परवाना लागू आहे. लक्षद्वीप पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती दिली असून, स्थानिक जमाती आणि समाजाला संरक्षण पोहोचवणं या स्थानिक प्रशासनाचा मुख्य हेतून क्षणा लक्षात येत आहे. लक्षद्वीपमधील परवाने भारतीय आणि परदेशी पर्यटकांना सम प्रमाणात लागू आहेत. 

परवान्यासाठी अर्ज कसा करावा? 

  • लक्षद्वीपच्या परवान्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा अवलंब करू शकता.
  • ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी तुम्हाला ePermit पोर्टल (https://epermit.utl.gov.in/pages/signup)  वर भेट देऊन तिथं एक अकाऊंट सुरु करावं लागेल. 
  • तुम्हाला इथं बेट आणि प्रवासाच्या तारखा निवडून पुढं महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. इथंच फीसुद्धा भरावी लागेल. 
  • यानंतर तुम्हाला ईमेल पद्धतीनं प्रवासाच्या 15 दिवसांपूर्वी एक परवाना येईल. 
  • ऑफलाईन पद्धतीनं परवाना घ्यायचा झाल्यास http://www.lakshadweeptourism.com/contact.html वरून अर्ज डाऊनलोड करू शकता किंवा कवरत्ती जिल्हाधिकारी कार्यालयातून तुम्ही अर्ज मिळवू शकता. 
  • अर्ज करून परवाना मिळण्याच्या या प्रक्रियेमध्ये अपेक्षेहून जास्त वेळ जाऊ शकतो. 

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? 

  • पासपोर्ट साईज फोटो 
  • वैध फोटो आयडी (आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना)
  • प्रवासाचं तिकीट 
  • हॉटेल बुकिंगचा पुरावा 

हेसुद्धा वाचा : उकडलेलं अंड किती वेळात संपवावं? ते कधी खराब होतं? 

लॅकाडीव, मिनिकॉय आणि अमीनदीवी द्वीप समूह कायदा 1967 नुसार या बेटांचे मूळ रहिवासी नसलेल्या प्रत्येकालाच परवाना अनिवा्य असतो. पण, या बेटांवर कामानिमित्त येणाऱ्या सरकारी अधिकारी आणि लष्कराच्या सेवेत असणाऱ्यांना मात्र यात सूट देण्यात आली आहे.