नवी दिल्ली : देशाच्या तेराव्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी औपचारिक प्रक्रिया सुरु झाली आहे. एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार 23 जूनला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कोअर ग्रुपसोबत चर्चा केली. व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह यांनी या निवडणुकीबाबतची माहिती पंतप्रधानांना दिली. दुसरीकडे संसद भवन परिसरात प्रमुख दहा विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत कोणत्याही नावावर चर्चा झाली नसल्याचं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय.
दरम्यान राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू शुक्रवारी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि सीताराम येचुरी यांची भेट घेणार आहेत. याआधी या दोघांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि बसपा नेते सतीश मिश्रा यांचीही भेट घेतलीय.