नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला धक्का देत पुन्हा एकदा भाजपला मदत करण्याचं ठरवलं आहे. गुजरातमध्ये उद्या होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार भाजपला पाठिंबा देणार आहेत. भाजपला पाठिंबा द्यायच्या सूचना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्याची माहिती गुजरातमधले राष्ट्रवादीचे आमदार कंधाल जडेजा यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचा विजय आणखी अवघड झाला आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंग राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून अहमद पटेल मैदानात आहेत. राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी ४५ मतांची आवश्यकता आहे पण काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत, त्यामुळे आता अहमद पटेल यांना धक्का बसणार असं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा देणार आहे, असा दावा अहमद पटेल यांनी केला होता पण राष्ट्रवादीनं मात्र वेगळी भूमिका घेतली आहे.
या निवडणुकीमध्ये आमदार फुटू नयेत म्हणून काँग्रेसनं त्यांच्या ४२ आमदारांना बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. काहीच दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला होता. त्याआधी विधानसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद असलेले बलवंतसिंह राजपूत, तेजश्रीबेन पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी पक्ष सोडून थेट भाजपामध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे गुजरातमधून काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभा निवडणूक लढवणारे अहमद पटेल आणि काँग्रेस पक्षाच्या अडचणीत वाढ झालीय.