निशस्त्र सैनिकांविषयी राहुल गांधींच्या मुद्दयाशी शरद पवारांची अप्रत्यक्ष असहमती

सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी मांडले मत  

Updated: Jun 19, 2020, 08:28 PM IST
निशस्त्र सैनिकांविषयी राहुल गांधींच्या मुद्दयाशी शरद पवारांची अप्रत्यक्ष असहमती title=

नवी दिल्ली: भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेशी अप्रत्यक्षपणे फारकत घेतल्याचे दिसून आले. राहुल गांधी यांनी शुक्रवारी  एक व्हीडिओ ट्विट केला होता. यामध्ये राहुल यांनी म्हटले होते की, चीनने भारताच्या निशस्त्र सैनिकांची हत्या केली. मात्र, आपल्या सैनिकांना निशस्त्रपणे कोणी पाठवले, यासाठी जबाबदार कोण, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. 

'सरकारमध्ये डोळे काढून हातात द्यायची ताकद', चीनच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोदींना पाठिंबा

 

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आजच्या बैठकीत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहेत. पवार यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारतीय सैनिकांनी शस्त्र बाळगावीत किंवा बाळगू नयेत, याचे काही नियम ठरले आहेत. त्यामुळे आपण अशा संवेदनशील मुद्द्यांचा आदर केला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे शरद पवार यांनी एकप्रकारे राहुल यांच्या भूमिकेशी अप्रत्यक्षपणे असहमती दर्शविल्याचे मानले जात आहे.

तत्पूर्वी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही शुक्रवारी राहुल गांधी यांना याच मुद्द्यावरुन प्रत्युत्तर दिले होते. आपण पहिले आपल्याला तथ्य समजून घेणं गरजेचं आहे. सीमेवर असलेल्या सैनिकांकडे नेहमीच हत्यारं असतात, खासकरून जेव्हा ते आपली जागा सोडतात. १५ जूनच्या रात्री गलवानमध्ये असलेल्या जवानांनी पण असंच केलं. पण १९९६ आणि २००५ सालच्या करारानुसार एलएसीवर (प्रत्यक्ष नियंत्रणरेषा) झटापटीच्या दरम्यान हत्यारांचा वापर केला जात नाही, याकडे  एस. जयशंकर यांनी राहुल गांधींचे लक्ष वेधले होते.