पंतप्रधानपदासाठी मायावती, चंद्राबाबू, ममता दीदी हे उत्तम पर्याय - शरद पवार

राहुल गांधी यांच्याऐवजी दिली या नेतेमंडळींच्या नावांना पसंती 

Updated: Apr 28, 2019, 04:07 PM IST
पंतप्रधानपदासाठी मायावती, चंद्राबाबू, ममता दीदी हे उत्तम पर्याय - शरद पवार   title=

मुंबई : loksabha election 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये अनेक नावं समोर येत असतानात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. एकिकडे देशात मोदी लाटेची चर्चा सुरू असताना दुसरीक़डे मात्र शरद पवारांनी राहुल गांधींऐवजी राजकीय पटलावरील अत्यंत महत्त्वाच्या नावांना पसंती देत पंतप्धानपदासाठी ते प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं. 'झी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमुल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी; आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्या नावांचा पवारांनी प्राधान्य दिलं आहे. 'पंतप्रधान पदच्या शर्यतीत काँग्रेसच्या राहुल गांधींपेक्षा ममता, माया किंवा नायडू हे कधीही चांगला पर्याय आहेत', असं ते म्हणाले. राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असणाऱ्या सर्व चर्चा उथळ असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. 

मायावती यांनी पंतप्रधानपदासाठीची इच्छा यापूर्वी अनेकदा व्यक्त केली आहे. तर, भाजपचा पराभव करणं हा ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबूंचा महत्त्वाचा हेतू असल्याचं कळत आहे. असं असलं तरीही पंतप्रधानपदासाठी त्यांच्याकडून मात्र कोणतीही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली माही. शिवाय आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीततून स्वत:ला दूर सारणाऱ्या शरद पवारांचं हे वक्तव्य पाहता लोकसभा निवडणुकांच्या या रणधुमाळीत ते किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचं स्पष्ट होत आहे.  

देशात चांगल्या नेत्यांची काहीच कमतरता नाही, असंही पवार म्हणाले. 'निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कोणाच्या नावाला पसंती द्यायची हे आम्ही ठरवू. सध्याच्याघडीला असे अनेक नेते आहेत जे या पदासाठी पात्र आहेत. त्यामुळे आतापासूनच कोणाचं नाव घेणं चुकीचं ठरेल असं म्हणत त्यांनी या सर्व प्रकरणी सूचक विधान केलं. पवारांचं हे वक्तव्य पाहता देशाच्या राजकीय पटलावर होणाऱ्या एकंदर हालचालींना आता वेग आला असून, निवडणुकांच्या निकालांकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.