NCERT ने 12 वीच्या अभ्यासक्रमातून गांधींचा हिंदू-मुस्लिम एकतेचा विचार, RSS वरील बंदींचा मजकूर हटवला

NCERT Textbooks Changes: मागील काही दिवसांपासून अभ्यासक्रमांमधील बदलाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता एनसीईआरटीने केलेल्या बदलासंदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे.

Updated: Apr 5, 2023, 05:56 PM IST
NCERT ने 12 वीच्या अभ्यासक्रमातून गांधींचा हिंदू-मुस्लिम एकतेचा विचार, RSS वरील बंदींचा मजकूर हटवला title=
RSS Gandhi Text Book

NCERT Textbooks Changes: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रीसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने नव्या शैक्षणिक वर्षामध्ये 12 वीच्या अभ्यासक्रमामधील पॉलिटिकल सायन्सच्या पुस्तकामध्ये बदल केला आहे. महात्मा गांधींसंदर्भातील मजकुराबरोबरच केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचा मजकूर पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे. 'महात्मा गांधींच्या मृत्यूचा देशातील जातीय सलोख्यावर परिणाम, गांधींची हिंदू-मुस्लिम एकतेच्या विचारांमुळे हिंदू कट्टरतावाद्यांना प्रवृत्त केलं,' याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांवर काही कालावधीसाठी बंदी घालण्यात आली होती यासंदर्भातील मजकूर काढण्यात आला आहे. एनसीईआरटीने मात्र यंदाच्या वर्षी अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. या वर्षी पाठ्यपुस्तकांमधील कोणताच मजकूर काढलेला नाही. मागील वर्षी जून महिन्यामध्येच हा बदल करण्यात आला.

काय स्पष्टीकरण दिलं?

मागील वर्षी पाठ्यपुस्तकांना तार्किकदृष्ट्या अधिक योग्य बनवण्याच्या उद्देशाने काही भाग योग्य नसल्याचं सांगत वगळला. यामध्ये गुजरात दंगल, मुघलांचा इतिहास, आणीबाणी, शीतयुद्ध, नक्षली आंदोलनासंदर्भातील भाग पुस्तकांमधून हटवण्यात आला आहे. यावेळी केलेल्या बदलांसंदर्भात माहिती देताना त्यामध्ये महात्मा गांधीसंदर्भातील माहिती बदलण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. "पुस्तकांना तार्किकदृष्ट्या योग्य करण्याचं काम मागील वर्षी करण्यात आलं. यावर्षी जे काही छापण्यात आलं आहे ते नव्याने केलेलं नाही," असं एनसीईआरटीचे निर्देशक दिनेश सकलानी यांनी सांगितलं. मात्र तार्किकदृष्ट्या पुस्तकांमध्ये बदल करताना हटवण्यात आलेल्या काही संदर्भांबद्दल सकलानी काहीही बोलले नाही.

वेबसाईटवरही माहिती

एनसीईआरटीच्या वेबसाईटवरही याबद्दलचं स्पष्टीकरण आहे. "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असं जाणवलं की विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचं ओझं कमी करणं आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अभ्यासक्रमाचं ओझं कमी करण्याबरोबरच रचनात्मक बदलाचा उपयोग करुन अनुभवांच्या आधारे शिकवण्यावर जोर देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे," असं वेबसाईटवरील स्पष्टीकरणात म्हटलं आहे. सन 2022-23 हे बदल होतीस आणि नंतर 2023-24 मध्येही होतील असंही म्हटलं आहे. 

अभ्यासक्रम बदलामुळे वाद

एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमामधून मुघलांचा इतिहास वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावरुनही देशभरामध्ये वेगवेगळी मतं उमटत आहेत. असं असतानाच आता महात्मा गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातील बदलही पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारनेही अभ्यासक्रमामध्ये बदल केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यावरुन उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे.