राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांची 'मन की बात', केलं हे मोठं विधान

नवज्योतसिंग सिद्धू यांनी 72 दिवसांनंतरच पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, अचानक घेतलेल्या या निर्णयाने काँग्रेस नेतृत्व हादरलं आहे

Updated: Sep 29, 2021, 12:57 PM IST
राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू  यांची 'मन की बात', केलं हे मोठं विधान title=

चंदीगड : पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंजाब काँग्रेसच्या (Punjab Congress) प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिद्धू (Navjotsingh Sidhu) यांनी आज एक व्हिडिओ जारी करत आपलं म्हणणं स्पष्ट केलं. या व्हिडिओत सिद्धू यांनी म्हटलं आहे,  हक्काच्या आणि सत्याची लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, माझं कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. माझी राजकीय कारकीर्द 17 वर्षांची आहे, जी बदल घडवून आणणार होती. लोकांचं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी आहे. हाच माझा धर्म आहे.

सिद्धू म्हणाले की मी हायकमांडची दिशाभूल करू शकत नाही आणि कोणाला करुही देणार नाही. पंजाबमधील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी मी बलिदान देईन. मला याबद्दल विचार करण्याची गरज नाही. सिद्धू यांनी कार्यवाहक डीजीपी इक्बाल प्रीत साहोटा यांना टोला लगावला आहे, ज्यांनी बादलांना क्लीन चिट दिली. त्यांच्यावर न्यायाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिद्धू यांनी माजी डीजीपी सुमेध सिंह सैनी यांचे वकिल एपीएस देओल यांच्यावरही टिप्पणी केली. सिद्धू म्हणाले की, अशा लोकांना आणून व्यवस्था बदलता येत नाही. नैतिकतेशी कोणीही तडजोड करू शकत नाही.

चन्नी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक

पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ सुरु असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक  सुरू झाली आहे. बैठकीत नवज्योतसिंग सिद्धू यांचे मन वळवण्याच्या रणनीतीवर चर्चा होत आहे. राजीनामा दिल्यानंतर सिद्धू त्यांच्या पटियाला इथल्या निवासस्थानी आहेत. त्याचवेळी, काँग्रेस-हायकमांडने सिद्धूचा राजीनामा नाकारला आहे आणि राज्य पातळीवरच त्यांचं मन वळवण्याविषयी प्रयत्न सुरु केले आहेत. दुसरीकडे सिद्धू यांच्या निवासस्थानी समर्थकांच्या भेटीगाठी सुरु आहेत.