Swami Vivekananda Jayanti: स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता येथे झाला. स्वामी विवेकानंद हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. तसेच प्रतिष्ठित, विद्वान, विचारवंत, लेखक होते. त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांच्याविषयी अभ्यास केला. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिवस (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांमुळे स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली. भारत तरूणांचा देश असून या तरूणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील. स्वामी विवेकानंद हे केवळ धार्मिक नेते नाही तर उत्कृष्ट लेखक आणि वक्त्ते सुद्धा होते. त्यांनी केलेली कामे ही युवकांसाठी प्रेरणा देणारी आहेत.
1879 साली स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) हे प्रेसीडेन्सी महाविद्यालयात प्रवेश परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस हे गुरुस्थानी लाभले आणि त्यांच्या जीवनाने वेगळी दिशा घेतली. रामकृष्ण परमहंसांची आणि विवेकानंदांची भेट 1881 साली कोलकात्यातील दक्षिणेश्वर काली मंदिरात झाली. त्यावेळी परमहंसांनी विवेकानंदाना मानवतेची सेवा हीच ईश्वराची सेवा असल्याचा मंत्र दिला. या मंत्राचा जप विवेकानंदांनी पुढे आयुष्यभर केला.
वाचा: तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? लगेचच चेक करा
स्वामी विवेकानंदानी (Swami Vivekananda) शिकागो येथे आजपासून सुमारे 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म संमेलनात भाग घेतला. त्याठिकाणी विवेकानंदानी धर्म आणि मानवता यावर केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा आजही प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. शिकागोमध्ये गेल्यानंतर विवेकानंदांनी भारतीय धर्म, मानवता आणि संस्कृतीवर दिलेल्या भाषणाने अनेकांना आश्चर्यचकीत केलं.विवेकानंदांना दम्याचा त्रास होता. त्यामुळे 4 जुलै 1902 साली वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी बेलूर येथील मठात त्यांचा मृत्यू झाला. बेलूर येथील गंगा नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.
- जागृत व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.
- प्रत्येक कामाला तीन टप्प्यांतून जावे लागते- उपहास, निषेध आणि स्वीकार
- कशाचीही भीती बाळगू नका. तुम्ही आश्चर्यकारक काम कराल. ही निर्भयता आहे जी एका क्षणात परम आनंद आणते.
- शिक्षण म्हणजे काय? ज्या संयमाने इच्छाशक्तीचा प्रवाह आणि विकास नियंत्रणात आणला जातो आणि तो फलदायी होतो त्याला शिक्षण म्हणतात.
- वाईट विचार आणि वाईट कृती तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जाते हे विसरू नका. त्याचप्रमाणे लाखो देवदूतांसारखे चांगले कृत्य आणि चांगले विचार अनंतकाळपर्यंत तुमचे रक्षण करेल
- लोक तुमची स्तुती करू शकतात किंवा तुमची निंदा करू शकतात. तुमचा आज मृत्यू झाला किंवा भविष्यात, तुम्ही न्यायाच्या मार्गापासून कधीही भरकटू नका.
- तुला जे वाटतं तेच तू बनशील. जर तुम्ही स्वतःला कमजोर समजत असाल तर तुम्ही कमजोर व्हाल. जर तुम्ही स्वतःला मजबूत समजत असाल तर तुम्ही मजबूत व्हाल.
- जोपर्यंत जगताय, तोपर्यंत शिका. अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे.
- एक कल्पना आहे. त्या कल्पनेला आपले जीवन बनवा, त्याचा विचार करा, त्याची स्वप्ने पहा, ती कल्पना जगा. तुमचा मेंदू, स्नायू, नसा, तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्या विचारात बुडून टाका आणि बाकीचे सर्व विचार बाजूला ठेवा, हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
- अभ्यासासाठी एकाग्रता आवश्यक आहे. एकाग्रतेसाठी ध्यान आवश्यक आहे. केवळ ध्यानाद्वारे आपण इंद्रियांवर संयम ठेवून एकाग्रता प्राप्त करू शकतो.