सुषमा स्वराज यांच्या निधनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हळहळले

'भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय संपुष्टात आलाय'

Updated: Aug 7, 2019, 12:02 AM IST
सुषमा स्वराज यांच्या निधनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हळहळले  title=

नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं वयाच्या ६७ वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र धक्का जाणवल्यानंतर त्यांना तातडीनं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या बातमीनं सर्वपक्षीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. 

'भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय संपुष्टात आलाय. जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरीबांच्या जीवनासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या एका नेत्याला गमावल्यानं भारत हळहळतोय. सुषमा स्वराज या कोट्यवधी लोकांच्या प्रेरणास्थान होत्या. त्या एक उत्कृष्ठ वक्ता आणि उत्कृष्ठ संसद सदस्य होत्या. पक्षात आणि बाहेरही त्या एक कौतुकाचा आणि आदराचा विषय होत्या. भाजपाच्या विचारसरणीच्या आणि हितसंबंधांच्या बाबतीत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्या एक उत्कृष्ठ प्रशासक होत्या. मंत्री म्हणूनही आम्हाला त्यांची दयाळू बाजू पाहायला मिळाली. जगाच्या कोणत्याही भागात संकटात सापडलेल्या भारतीयांना त्यांनी मदत पुरवली' असं म्हणत पंतप्रधानांनी सुषमा स्वराज यांच्या कष्टाचा उल्लेख केलाय. 

'गेल्या पाच वर्षांत सुषमाजींनी परराष्ट्र मंत्री म्हणून अथक परिश्रम घेतले. त्यांची प्रकृती ठिक नसतानाही त्यांनी कामाला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. सुषमाजीचं निधन हे आमचं वैयक्तिक नुकसान आहे. त्या भारतासाठी घेतलेल्या कष्टांसाठी आठवणीत राहतील. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या, समर्थकांच्या दु:खात सहभागी आहोत. ओम शांती' असंही पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. 

सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५३ रोजी झाला होता. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यासोबतच त्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकीलदेखील होत्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर सुषमा स्वराज दुसरी महिला होत्या ज्यांनी परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. १९७७ साली वयाच्या केवळ २५ व्या वर्षी त्या पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्री पदही भूषवलं होतं. 

सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांपैंकी एक होत्या. भाजपाच्या महिला नेत्यांमध्ये त्यांचं स्थान वरच्या क्रमांकावर होतं. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषण शैलीसाठी त्या ओळखल्या जात होत्या. लोकसभा आणि राज्यसभेतील त्यांची अनेक भाषणं चर्चेत राहिली. 

परराष्ट्र मंत्रालयाचा भार पेलल्यानंतर २०१९ साली मात्र सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं. २००९ आणि २०१४ मध्ये मध्यप्रदेशच्या विदिशामधून निवडणूक जिंकल्या होत्या. २००९ ते २०१४ पर्यंत त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका संसदेत मांडली होती.