लालकृष्ण अडवाणींकडून नव्या खासदारांना खूप काही शिकण्यासारखे- नरेंद्र मोदी

राजकारणात जवळपास ५० वर्षे होऊनही आजही हे नेते सभागृहात पूर्णवेळ बसतात.

Updated: Feb 13, 2019, 05:36 PM IST
लालकृष्ण अडवाणींकडून नव्या खासदारांना खूप काही शिकण्यासारखे- नरेंद्र मोदी title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभा अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांची प्रशंसा केली. लालकृष्ण अडवाणी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून तरुण खासदारांना अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. राजकारणात जवळपास ५० वर्षे होऊनही आजही हे नेते सभागृहात पूर्णवेळ बसतात. इतक्या वर्षानंतरही ते आपली जबाबदारी इमान-इतबारे पार पाडत आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मोदींनी आपल्या आजच्या भाषणात पुन्हा एकदा सरकारची कामगिरी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तसेच विरोधकांना हळूवार चिमटेही काढले. त्यांनी म्हटले की, १६ व्या लोकसभेच्या निमित्ताने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे गोत्र नसलेले पूर्ण बहुमतातील सरकार आले. यापूर्वी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आले होते. मात्र, त्यावेळी सरकारकडे बहुमत नव्हते. या सगळ्याचे श्रेय २०१४ साली जनतेने घेतलेल्या निर्णयाला जात असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. 

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत- मुलायमसिंह यादव

तसेच पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत आलेल्या अनुभवांविषयीही मोदींनी यावेळी मिष्किलपणे भाष्य केले. याठिकाणी आल्यानंतरच मला 'गले मिलना' आणि 'गले पडना' या शब्दांमधील भेद लक्षात आल्याचे मोदी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सभागृहातील सदस्यांचे आभारही मानले. लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन होते. दरम्यान, आजच्या कामकाजानंतर लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली.