'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे मुंबई, गुजरात, दिल्लीत कोरोना पसरला - संजय राऊत

संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका 

Updated: May 31, 2020, 03:36 PM IST
'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे मुंबई, गुजरात, दिल्लीत कोरोना पसरला - संजय राऊत  title=

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुजरात, मुंबई आणि दिल्लीत कोरोनाचे संक्रमण व्हायला फेब्रुवारी महिन्यात अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेला 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ट्रम्प यांच्या शिष्टमंडळातील काही सदस्यांचा देखील या कार्यक्रमात सहभाग होता. यामुळे कोरोना विषाणूचं संक्रमण झाल्याच म्हटलं आहे. 

तसेच संज राऊत यांनी 'सामना'च्या मुखपत्रात केंद्र सरकारवर देखील टीका केली आहे. लॉकडाऊन कोणतीही योजना न आखता लागू केला मात्र आता जेव्हा लॉकडाऊन काढण्याची वेळ आली तेव्हा संपूर्ण जबाबदारी राज्यांवर सोडली आहे. 

तसेच खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सरकार पाडण्याचे भाजपकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र महाविकास आघाडीला कोणताच धोका नाही. याचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधील साप्ताहिक स्तंभात राऊत म्हणतात की,'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी खूप मोठा जनसमुदाय एकत्र आला होता. यामुळेच गुजरातमध्ये कोरोनाची लागण झाली. एवढंच नव्हे तर शिष्टमंडळातील काही व्यक्ती मुंबई आणि दिल्लीत देखील गेले होते. म्हणून कोरोना विषाणूचा फैलाव झाला.'

ट्रम्प आणि मोदींनी २४ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये एक रोड शो आयोजित केला होता. ज्यामध्ये हजारो लोकांचा समावेश होता. रोड शोनंतर दोन्ही नेत्यांनी मोटेरा क्रिकेट मैदानात जवळपास १ लाखाहून अधिक लोकांना संबोधित केलं. लॉकडाऊन कोणतीही पूर्व नियोजीत तयारी न करता करण्यात आला. आणि आता कोणतीही योजना न आखता ही जबाबदारी राज्यांवर सोपवण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केंद्र सरकारवर केला आहे.