मुजफ्फरनगर दंगल प्रकरणात सात जण दोषी; ८ फेब्रुवारीला शिक्षेची सुनावणी

यानंतर मुजफ्फरनगर व शामली परिसरात दंगल भडकली होती. 

Updated: Feb 6, 2019, 08:35 PM IST
मुजफ्फरनगर दंगल प्रकरणात सात जण दोषी; ८ फेब्रुवारीला शिक्षेची सुनावणी title=

नवी दिल्ली: तब्बल सहा वर्षानंतर मुझफ्फरनगर दंगल प्रकरणात सत्र न्यायालयाने बुधवारी सात जणांना दोषी ठरवले. २०१३ साली झालेल्या दंगलीवेळी कवाल या गावातील सचिन आणि गौरव या दोन हिंदू युवकांना जमावाने ठार मारले होते. मुझफ्फरनगर दंगलीत एकूण ६३ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४० हजार लोक विस्थापित झाले होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती हिमांशु भटनागर यांनी मुझम्मिल, मुजासिम, फुरकन, नदीम, जहांगीर, अफझल आणि इकबाल या सात जणांना दोषी ठरवले. येत्या शुक्रवारी त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. 

मुझफ्फरनगर दंगलीचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी काहीजणांच्या मते जाट समाजातील एका तरुणीची शहनवाज कुरेशी या तरूणाने छेड काढली होती. त्यामुळे तरूणीचे नातेवाईक असलेल्या सचिन आणि गौरव यांनी २७ ऑगस्टला शहनवाजची हत्या केली होती. यावेळी मुस्लिम जमावाने केलेल्या प्रतिहल्ल्यात सचिन व गौरव यांचा मृत्यू झाला होता. यानंतर मुजफ्फरनगर व शामली परिसरात दंगल भडकली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश सरकारने मुजफ्फरनगर दंगलीतील ३८ गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती. त्यासाठी जिल्हा न्यायालयात २९ जानेवारीला शिफारस अहवालही पाठवण्यात आला होता. न्यायालयाने सरकारी पक्षाचे दहा आणि बचावपक्षाचे सहा साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा निकाल दिला. २०१३ च्या या दंगलीनंतर एकूण ६००० खटले दाखल झाले होते. तर १४८० आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.