केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 17, 2017, 10:54 AM IST
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न title=
File Photo

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये भरदिवसा मुख्तार अब्बास नक्वी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. नक्वी यांची बहिण फरहात नक्वी या ऑफिसमधून घरी परत येत असताना काही अज्ञातांनी त्यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नक्वींची बहिण फरहत या एका बैठकीनंतर ई-रिक्षातून आपल्या घरी परतत होत्या. त्याच दरम्यान, गाडीतून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांची रिक्षा थांबवली आणि अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फरहात नक्वी यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यानंतर घाबरलेल्या आरोपींनी तेथून पळ काढला.

या आरोपींनी फरहत नक्वी यांना नंतर पाहतो अशी धमकी दिल्याचं म्हटलं जात आहे. आता या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फरहत नक्वी या तीन तलाक आणि त्यासंबंधीत पीडित महिलांच्या मदतीसाठी 'मेरा हक फाऊंडेशन' नावाचं एनजीओ चालवतात. तीन तलाकविरोधात मोहिम चालवल्यामुळे त्यांना यापूर्वीही अनेक धमक्या मिळाल्या आहेत. मात्र, आता तर त्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज हाती घेतलं असून अधिक तपास सुरु आहे. मात्र, अद्याप कुठलाही पूरावा हाती लागलेला नाहीये.