अंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले

मुकेश अंबानीच्या नेतृत्तावील रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठिंबा दिलेल्या डंजो कंपनीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. डंजो कंपनीत रिलायन्स रिटेलची 25.8 टक्के भागीदारी आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 4, 2023, 01:37 PM IST
अंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले title=

क्विक कॉमर्स तसंच लॉजिस्टिक्स कंपनी डंजो (Dunzo) सध्या संकटाचा सामना करत आहे. कंपनीतील अनेक मोठ्या पदावरील अधिकारी राजीनामा देत आहेत. तसंच दुसरीकडे फंडिंग कमी असल्याने कर्मचाऱ्यांना पगारासाठी फार प्रतिक्षा करावी लागत आहे. फक्त गेल्या दोन महिन्यात कंपनीच्या सह-संस्थापकांसह चार अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. याशिवाय आणखी एक अधिकारी बाहेर पडल्याची चर्चा आहे. या कंपनीत आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीची मोठी भागीदारी आहे. या कंपनीने गुगलनेही पैसे गुंतवले आहेत. 

रिलायन्सकडे 26 टक्के भागीदारी

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजचा पाठिंबा असलेल्या डंजोची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. या कंपनीत रिलायन्स रिटेल सर्वात मोठी स्टेकहोल्डर आहे. त्यांच्याकडे डंजोमधील 25.8 टक्के भागीदारी आहे. रिपोर्टनुसार, फंडिंगच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या करणाऱ्या या स्टार्टअपकडून रक्कम निधी गोळा करण्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा केली जात आहे. रिलायन्सदेखील कंपनीला यात मदत करत आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सर्वात मोठी भागीदारी असणाऱ्या मुकेश अंबानींच्या कंपनीने आता गुंतवणूक वाढवण्यात रस दाखवलेला नाही.  

ऑगस्टपासून राजीनामासत्र

डंजोमधील हायप्रोफाईल राजीनाम्यांची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाली होती. 3 ऑगस्ट 2023 रोजी अश्विन खासगीवाला आणि राजेंद्र कामथ डंजोच्या बोर्डातून बाहेर पडले. दोघेही कंपनीत मोठ्या पदावर होते आणि संचालक मंडळात सहभागी होते. 

यानंतर 21 ऑगस्टला डंजोमध्ये 8 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी असणाऱ्या लाइटरॉक इंडियाच्या पार्टनर वैदेही रवींद्रन यांनी कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. तसंच महिन्याच्या अखेरीस 29 ऑगस्टला डंजोचे सह-संस्थापक दलवीर सुरी यांनी बोर्डाचा राजीनामा दिला. 

कर्मचाऱ्यांचे पगार अडकले

फंडिंग कमी असल्याने आणि रोख रकमेच्या संकटाचा सामना करणाऱ्या बंगळुरुमधील डंजो कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर पगाराचीही समस्या आहे. रिपोर्टनुसार, कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांना आपल्या पगारासाठी फार वाट पाहावी लागेल असे संकेत देण्यात आले आहेत. डंजोपासून वेगळे झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या फूल अॅण्ड फायनल पेमेंटसाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 पर्यंत वाट पाहावी लागू शकते. कंपनीत सलग राजीनामे दिले जात असतानाही 200 ते 300 कोटी मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी गुंतवणूकदारांसमोर प्रस्ताव ठेवले जात आहेत.