मुंबई : लग्नसराईच्या उत्साहपूर्ण सर्वत्र दीपिका आणि रणवीर किंवा प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असल्या तरीही आता मात्र या चर्चा काही प्रमाणात शमण्य़ाची शक्यता आहे. कारण, उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी आणि आनंद पिरामलची लग्नपत्रिका सर्वांसमोर आली आहे.
अतिशय सुरेख, लक्षवेधी आणि तितक्याच थक्क करणाऱ्या किंमतीची ही पत्रिका सर्वांचं लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे त्यात टीपण्यात आलेले बारकावे.
भारतीय सभ्यता आणि संस्कृतीमध्ये कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना दिला जाणारा आदर लक्षात घेत आनंद आणि इशाची ही पत्रिका त्यांच्या कुटुंबातील अशाच मोठ्या व्यक्तींना समर्पित करण्यात आल्याचं वृत्तं 'वोग इंडिया'ने प्रसिद्ध केलं आहे.
फ्लोरल डिझाईन असणाऱ्या या पत्रिकेत सौम्य रंगांचा वापर करत आणि 'ओम'ला केंद्रस्थानी ठेवत इशा आणि आनंदच्या नावांची आद्याक्षरं छापण्यात आली आहेत. त्याशिवाय गायत्री मंत्राचा अतिशय सुरेख असा वापरही या पत्रिकेत करण्यात आल्याचं कळत आहे.
आपल्या आजी-आजोबांविषयीच्या भावनांना पत्रिकेच्या माध्यामातून इशाने वाट मोकळी करुन दिली असून, तिच्याच हस्ताक्षरात पत्रिकेत हा मजकूर अतिशय सुरेखपणे छापण्यात आला आहे.
पत्रिकेची किंमत जवळपास ३ लाख रुपये इतकी असून, सध्याच्या घडीला हा आकडाच अनेकांच्या भुवया उंचावत आहे. १२ डिसेंबरला मोठ्या थाटात आणि उत्साहात इशा आणि आनंदचा विवाहसोहळा पार पडणार आहे. ज्या विवाहसोहळ्याची उद्योगजगतालाही उत्सुकता लागून राहिलेली आहे.