पॅन कार्डचा गैरवापर, विद्यार्थ्याला 46 कोटींची Tax Notice, तुमचे पॅन सुरक्षित आहे का?

PAN Card Misuse: तुमचे पॅन कार्ड सुरक्षित आहे का? हे तपासण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा. अलीकडेच या घटनांमध्ये वाढ झाल्याची चिन्हे आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 31, 2024, 02:56 PM IST
पॅन कार्डचा गैरवापर, विद्यार्थ्याला 46 कोटींची Tax Notice, तुमचे पॅन सुरक्षित आहे का?  title=
MP student get rs 46 crore income tax notice, how to check pan card fraud

PAN Card Misuse: पॅन कार्डचा गैरवापर करुन गंडा घातल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. राजकुमार राव आणि सनी लिओनीयांच्यासह अनेक दिग्गजांच्या पॅनकार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. असाच एक प्रकार मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये समोर आला आहे. ग्वालियरच्या जीवाजी विद्यापिठात शिकणाऱ्या प्रमोद दंडोतिया नावाच्या एका विद्यार्थ्याला कर विभागाने 46 कोटींची टॅक्स नोटिस जारी केली आहे. ज्या व्यक्तीकडे फी भरण्याचेही पैसे नाहीयेत त्याला 46 कोटींची नोटिस आल्यावर त्याच्यावर आभाळ कोसळले आहे. 

विद्यार्थी प्रमोद दंडोतिया याच्या पॅन कार्डचा गैरवापर करुन एका अज्ञात व्यक्तीने एक कंपनी बनवली होती. त्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून 46 कोटींचे व्यवहार केले. इतकंच काय तर जीएसटीदेखील भरला नाही. आता इनकम टॅक्स विभागाने 46 कोटींच्या व्यवहाराच्या आधारे विद्यार्थ्याला नोटिस जारी केली आहे. ही नोटीस पाहून प्रमोदचे डोळेच पांढरे झाले. त्याने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तसंच, इनकम टॅक्स विभागातही तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे समोर आले की, त्याच्या नावावर दिल्ली आणि पुणेमध्ये एक कंपनी रजिस्टर आहे. ज्याच्या माध्यमातून करोडो रुपयांचे व्यवहार होत आहेत. जे आज प्रमोदसोबत घडलं ते उद्या तुमच्यासोबतही घडू नये यासाठी पॅनकार्डचा गैरवापर होऊ नये, यासाठी ही काळजी घ्या.

पॅन कार्डचा गैरवापर कसा टाळावा?

तुमच्याही पॅन कार्डचा गैरवापर होतोय का हे चेक करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचा सिबील स्कोर चेक करा. जर तुमच्या पॅन कार्डवर लोन असेल तर तुम्हाला त्याची माहिती लगेच मिळून जाईल. तुम्ही हे लोन नसेल घेतलं तर लगेचच माहिती घेऊन तक्रार करा. तसंच, तुमच्या पॅन कार्डच्या माध्यमातून ट्रान्सक्शनची हिस्ट्री तुम्ही आरामात तपासू शकतो. व्हेरिफाय युवर आयडेंटिटीवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडून काही माहिती मागवली जाईल. त्यानंतर पॅन नंबरवर आत्तापर्यंत किती व्यवहार झाले याची माहिती समोर येईल. 

कशी कराल तक्रार?

पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचे लक्षात येताच लगेचच इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जाऊन तक्रार करा. त्यासाठी एक वेगळी वेबसाइटदेखील बनवण्यात आली आहे. तुम्ही https://incometax.intelenetglobal.com/pan/pan.asp  वर जाऊन तक्रार दाखल करु शकता. त्यासाठी कस्टमर सर्व्हिसवर जाऊन तिथे तक्रार करण्याचा पर्याय निवडा. तक्रारीची पूर्ण माहिती देऊन कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. त्यानंतर तुमची तक्रार दाखल होईल.