ग्वाल्हेर किल्ल्याखाली सापडला प्रसिद्ध टुरिस्ट गाईडचा मृतदेह; समोर आली धक्कादायक माहिती

MP Crime : मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर किल्ल्यावर प्रसिद्ध टुरिस्ट गाईडचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून या टुरिस्ट गाईडबाबत वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर आली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 26, 2023, 05:10 PM IST
ग्वाल्हेर किल्ल्याखाली सापडला प्रसिद्ध टुरिस्ट गाईडचा मृतदेह; समोर आली धक्कादायक माहिती title=

MP Crime News : मध्य प्रदेशातील (MP News) ग्वाल्हेर किल्ल्यावर (gwalior fort) संशयास्पद परिस्थितीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुण हा ग्वाल्हेर किल्ल्यावरच गाईडचे (Tourist Guide) काम करणारा कालू असल्याचे समोर आले आहे. कमी वयातच अनेक देश आणि परदेशी भाषांचे ज्ञान असलेल्या कालूचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कालूने ग्वाल्हेर किल्ल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याचे म्हटलं जात आहे. कालूचा मृतदेह सोमवारी सकाळी गडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच बहोदापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी (MP Police) कालूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. यासोबतच ही आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास पोलीस करत आहेत.

कालूला स्मॅकचे व्यसन होते आणि तो रोजच्या रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत धूम्रपान करत होता, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. याच कारणामुळेच कालूने आत्महत्या केली असावी असेही म्हटलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून कालू ग्वाल्हेर किल्ल्यावरील गाईडचे काम सोडून दिवसरात्र नशाच करत होता. दुसरीकडे कालूसोबत काहीतरी चुकीचं घडल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या सर्व बाबींचा कसून तपास करत असून, तपासानंतरच कालूच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होणार आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कालूला काही वर्षांपासून अंमली पदार्थांची इतकी वाईट सवय लागली होती की तो दिवसभर धूम्रपान करत फिरायचा. यामुळे त्याने परदेशी पर्यटकांना माहिती देण्याचे कामही बंद केले होते. अख्ख्या किल्ल्यावर प्रसिद्ध असलेल्या कालूला  ड्रग्जचे वाईट व्यसन लागलं होतं. यामुळे तो रात्रंदिवस स्मॅक घेऊ लागला होता. अशातच सोमवारी सकाळी कालूचा मृतदेह संशयास्पद स्थितीत गडाखाली सापडला. स्थानिकांनी तिथून जाताना कालूचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तो कालूचा मृतदेह असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ कालूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

 25 वर्षीय कालू याचे बालपण ग्वाल्हेरमध्येच गेले होते. बहोदापूर परिसरात राहणारा कालू लहानपणापासून ग्वाल्हेर किल्ल्यावर जात होता. किल्ल्यावर येणारे परदेशी पर्यटक आणि त्यांच्यासोबत बाहेरून येणारे पर्यटक गाईड यांच्याशी तो ओळख वाढवायचा. हळूहळू त्यालाही  टुरिस्ट गाईडचे काम आवडू लागले. काम आवडल्याने त्याने लगेचच इंग्रजीसह सुमारे 8 परदेशी भाषा शिकून घेतल्या. त्यानंतर तो देश-विदेशातील आणि विविध राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांना ग्वाल्हेर किल्ल्याची माहिती द्यायचा. याच्यातूनच त्याला पैसेही मिळू लागले. आठ भाषा बोलता येत असल्याने ग्वाल्हेरमध्ये त्याला लवकरच प्रसिद्धी देखील मिळाली होती.

शाळेत न जाता एवढं ज्ञान असल्याने सगळेच त्याला ओळखू लागले होते. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. मात्र सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह किल्ल्यात असलेल्या सास बहू मंदिराच्या पायथ्याशी झुडपात आढळून आला.