'वंदे भारत'च्या टॉयलेटचा दरवाजा तोडून तरुणाला बाहेर काढलं; जाणून घ्या नक्की घडलं काय

Man Inside Vande Bharat Express Washroom: ही व्यक्ती अनेक तास या ट्रेनच्या टॉयलेटमध्येच होती. तिला बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. अखेर सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर ट्रेन एका स्थानकावर थांबवून या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 26, 2023, 04:54 PM IST
'वंदे भारत'च्या टॉयलेटचा दरवाजा तोडून तरुणाला बाहेर काढलं; जाणून घ्या नक्की घडलं काय title=
केरळमध्ये घडला हा विचित्र प्रकार

Man Inside Vande Bharat Express Washroom: भारतामधील सर्वात प्रमिअम ट्रेन अशी ओळख असलेल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'मध्ये (Vande Bharat Express) रविवारी (25 जून 2023 रोजी) एक विचित्र प्रकार घडला. केरळमधील कासरगोड जिल्ह्यामध्ये 'वंदे भारत एक्स्प्रेस' ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने स्वत:ला ट्रेनच्या टॉयलेटमध्ये कोंडून घेतलं. हा प्रवासी टॉयलेटमधून बाहेर येण्यास तयारच नव्हता. मात्र नंतर या व्यक्तीला जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमधील टॉयलेटमध्ये या व्यक्तीने स्वत:ला कोंडून घेतल्याने गोंधळ उडाल्यानंतर ट्रेन शोरनूर रेल्वे स्थानकामध्ये थांबली. या ठिकाणी टॉयलेटचा दरवाजा तोडून या व्यक्तीला बळजबरीने बाहेर काढण्यात आलं.

...अन् त्याला बाहेर काढण्यात आलं

स्थानिक वृत्तवाहिन्यांनी या घटनेचे काही व्हिडीओ दाखवले आहेत. यामध्ये लाल रंगाचं शर्ट घातलेल्या या व्यक्तीला दरवाजा तोडून टॉयलेटमधून बाहेर काढण्यात आलं तेव्हा तो घाबरलेल्या अवस्थेत होता. त्यानंतर या फुटेजमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजेच सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी नेलं. हे अधिकारी या व्यक्तीकडे चौकशी करत असल्याचंही फुटेजमध्ये दिसून आलं आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने आपण मूळचे महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला होता. ही व्यक्ती हिंदीमध्ये बोलत होती. मात्र नंतर या व्यक्तीने पुन्हा आपण कासरगोडाचे असल्याचं सांगितलं. त्यामुळेच ही व्यक्ती नेमकी कुठली आहे याची माहिती समोर आली नाही. मात्र ही व्यक्ती अनेक तास ट्रेनच्या टायलेटमध्येच होती.

...म्हणून मी स्वत:ला टॉयलेटमध्ये कोंडून घेतलं

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा या व्यक्तीला दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याच्याकडे 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेलं तिकीटही नव्हतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने सीआरपीएफच्या चौकशीमध्ये माझा कोणीतरी पाठलाग करत होतं असा दावा केला आहे. याच व्यक्तीपासून जीव वाचवण्यासाठी आपण टॉयलेटमध्ये कोंडून घेतलं होतं. जेव्हा ट्रेन कन्नूर आणि कोझिकोड स्टेशनवर थांबली तेव्हा आरपीएफ आणि अन्य अधिकाऱ्यांनी अनेकदा दरवाजा उघडण्यास सांगितल्यानंतरही त्याने दरवाजा उघडला नव्हता. अखेर त्याला शोरनूरमध्ये दरवाजा तोडून टॉयलेटमधून बाहेर काढण्यात आलं. या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा प्राथमिक अंदाजही व्यक्त केला जात आहे. 

लवकरच मुंबई-गोवा 'वंदे भारत एक्स्प्रेस'

'वंदे भारत एक्स्प्रेस' सध्या देशातील एकूण 18 मार्गांवर धावते. त्यापैकी 3 ट्रेन महाराष्ट्रातून धावतात. लवकरच मुंबई ते गोवा मार्गावर 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची सेवा सुरु होणार आहे. ही महाराष्ट्राला मिळणारी चौथी 'वंदे भारत एक्स्प्रेस' ठरणार आहे. मुंबई-गोवा 'वंदे भारत एक्स्प्रेस'चं उद्घाटन 3 जून रोजी होणार होतं. मात्र ओडिशामध्ये 2 जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. याशिवाय अन्य 4 मार्गांवरही 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची सेवा सुरु होणार असल्याने एकूण 23 मार्गावर ही सेवा सुरु होईल.