Moscow To Goa Flight: 247 प्रवाशांना घेऊन गोव्याच्या दिशेनं येणारं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी...

Moscow To Goa Flight:  नेपाळ दुर्घचनेच्या आठवणी मागे पडत नाहीत तोच आणखी एका बातमीनं विमान प्रवास करणाऱ्यांना जबर हादरा. तुमचं कुणी या विमानात नव्हतं ना... ? 

Updated: Jan 21, 2023, 12:02 PM IST
Moscow To Goa Flight:  247 प्रवाशांना घेऊन गोव्याच्या दिशेनं येणारं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी...  title=
Moscow To Goa bomb threat in Flight latest Marathi news

Moscow To Goa Flight: रशियाच्या मॉस्को येथून भारतात गोव्याच्या दिशेनं येणाऱ्या एका विमानाला बॉम्बन उडवण्याची धमकी मिळाल्यामुळं एकच खळबळ माजली. गोवा विमानतळावर एका ईमेलच्या माध्यमातून ही धमकी मिळाली. ज्यानंतर सतर्कतेची पावलं उचलत भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच या विमानाचा मार्ग वळवून ते उझबेकिस्तानच्या दिशेनं फिरवण्यात आलं. उझबेकिस्तानमध्ये लँड केल्यानंतर तातडीनं या विमानात बॉम्ब शोधक पथक दाखल होत पुढील कारवाई सुरु केली. 

संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान (Azur Air) अजुर एअर या विमानसेवा देणाऱ्या कंपनीचं असून, त्यामध्ये 247 प्रवासी प्रवास करत होते. सध्या हे सर्व प्रवासी उझबेकिस्तानातील विमानतळावर सुखरूप आहेत. 

गोव्याच्या दिशेनं येणाऱ्या एखाद्या विमानाला बॉम्बनं उडवण्याची धमकी दिली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अजुर एअरच्या एका चार्टर्ड प्लेनला बॉम्बनं उडवण्याची धमकी दिली होती. ज्यानंतर विमानाला गुजरातमध्ये जामनगरच्या दिशेनं वळवलं गेलं होतं. दरम्यान, अजुर एअरचं हे विमान AZV2463 पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दक्षिणेकडे असणाऱ्या डाबोलिम विमानतळावर लँड होणार होतं. पण, भारतीय हवाई हद्दीत येण्याआधीच त्याचा मार्ग वळवण्यात आला.  

एका ईमेलमुळं माजली खळबळ 

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री उशिरा साडेबारा वाजण्याच्या सुमारास डाबोलिम विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेल आला. ज्यानंतर ते तातडीनं उझबेकिस्तानच्या दिशेनं वळवलं गेलं. रशियाच्या दूतावासाकडून आलेल्या माहितीनुसार अजुर एअरच्या या विमानाविषयी भारतीय अधिकाऱ्यांना फार आधिकच सतर्क करण्यात आलं होतं.