लाहौल- स्पिती : थंडीच्या मोसमाची सुरुवात झाल्यापासून हिमाचल प्रदेश आणि देशातील उत्तरेकडे असणाऱ्या काही राज्यांच्या तापमानाचा पारा खाली गेल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला हिमाचल प्रदेशमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे येथील कुल्लू, मनाली, कसोल, लाहौल- स्पितीचं खोरं या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार लाहौल- स्पिती येथे सध्याच्या घडीला एकूण १२जण अडकल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या बारापैकी दहाजण जे अभ्यासक आणि तज्ज्ञ असल्याचं कळत आहे. सरकारच्या अनुदानीत प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या अभ्यासासाठी ते त्या ठिकाणी हेले होते. या ठिकाणी २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान Horticilture Development Project अर्थात फलोत्पादन विकासाच्या अभ्यासाठी आखण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्वजण आले होते.
लाहौल- स्पिती या परिसरात मोठ्या प्रमाणात होणारी बर्फवृष्टी पाहता 'बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन' अर्थात बीआरओकडून निर्माणाधीन असणाऱ्या रोहतांग बोगदा येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही पावलं उचलण्यात आली आहेत.
Himachal Pradesh: A group of 12 people are stranded in Sissu area of Lahaul-Spiti district due to heavy snowfall. (27.11) pic.twitter.com/9bvbfoSQSR
— ANI (@ANI) November 27, 2019
अभ्यासकांच्या या चमूतील किरण नामक एका व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार मनाली मार्गाने रोहतांग बोगद्याचा वापर करत ही मंडळी लाहौल- स्पितीमध्ये दाखल झाली होती. गुरुवारी त्यांचं परतणं अपेक्षित होतं. पण, आता अतिबर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे त्यांच्या परतण्यास आणखी वेळ दवडला जाणार आहे.