आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल; महाराष्ट्रात कधी?

पावसाची शेतकरी आतुरतेनं वाट पाहात असतो. तो मान्सून अखेर दाखल झाला आहे. अंदामानात मान्सून दाखल झाला आहे

Updated: May 16, 2022, 03:18 PM IST
आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल; महाराष्ट्रात कधी?  title=

मुंबई: पावसाची शेतकरी आतुरतेनं वाट पाहात असतो. तो मान्सून अखेर दाखल झाला आहे. अंदामानात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात 22 मे रोजी दाखल होणार होता.

मात्र यंदा हा मान्सून सहा दिवस आधीच म्हणजे 16 मे रोजी दाखल झाला आहे. हवमान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र केरळमध्ये सुध्दा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे.

यंदा केरळमध्ये मान्सून 27 मे रोजी दाखल होण्याची दाट शक्यता आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, महाराष्ट्रात किंवा मुंबईत मान्सून कधी येईल हे अद्याप सांगता येणार नाही. मात्र देश पातळीवर एकूण मान्सूनचा विचार केल्यास सरासरीच्या 99 टक्के पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

शेतीच्या कामाला गती

मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होईल. देशात सरासरी 99 टक्के पावसाचा अंदाज देखील हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे शेतकरी देखील सुखावला आहे.

शेतीच्या कामांना सुरुवात करण्यास हवामान खात्याकडून हिरवा कंदिल मिळाला आहे . राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देखील देण्यात आला. विदर्भात उष्णतेची लाट आहे . मान्सून केरळातून जेव्हा उत्तरेकडे वळेल तेव्हा उष्णतेच्या लाटेवर परिमाण होणार असल्याचं सुद्धा होसाळीकरांनी झी 24 तासला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे.
 

उष्णतेच्या लाटेपासून दिलासा 

एकीकडे मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. तर दुसरीकडे विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. 
मार्च महिन्यापासून विदर्भात जानवणाऱ्या उन्हाच्या झळा शांत होणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार. पुढील तीन दिवस 2 ते 3 डिग्रीने तपमान घट होणार आहे. शिवाय दुपारनंतर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून नागपूरचा पारा 45 अंशावर पोहोचला आहे . तर चंद्रपुराचा पारा 46.8 अंशावर गेला आहे. उन्हाने अंगाची लाहीलाही होणाऱ्या नागपूरकरांसाठी ही समाधानाची बाब म्हणावी लागेल