मुंबई : देशात कोरोनानंतर मंकीपॉक्सच्या रूग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. आतापर्यंत देशात मंकीपॉक्सचे तीन रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे मंकीपॉक्सच्या आजाराचा धोका कायम असताना आता आणखीण एका आजाराने राज्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनासह, राज्य सरकारची चिंता वाढलीय.
केरळमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असताना आता टोमॅटो फ्लूचा धोकाही वाढला आहे. या नवीन आजाराने बाधित केरळमध्ये अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जिथे 5 वर्षांखालील लहान मुलांना या तापाचा सर्वाधिक धोका आहे. दरम्यान मे महिन्यापासून केरळमधील कोल्लम जिल्ह्यात 80 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे मंकीपॉक्ससह आता टोमॅटो फ्लूचाही धोका वाढला आहे.
टोमॅटो फ्लू का म्हणतात?
या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या त्वचेवर तापासह लाल पुरळ येतात. या पुरळचा रंग सामान्यतः लाल असतो. त्यामुळे या आजाराला 'टोमॅटो फ्लू' असे नाव देण्यात आले आहे. या टोमॅटो फ्लूचा मुलांच्या जिविताला धोका नसतो.
लक्षणे काय?
लहान मुलांमध्ये या विषाणूची सर्वात सामान्य लक्षणे दिसतात ती म्हणजे पुरळ उठणे, त्वचेची जळजळ आणि डिहायड्रेशन. लहान मुलांना सांधेदुखी, उच्च ताप, पुरळ, ओटीपोटात पेटके, मळमळ, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे, नाक वाहणे, खूप ताप आणि अंगदुखी सारखी लक्षणे दिसतात.
उपचार पद्धती काय?
टोमॅटोचा ताप हा संसर्गजन्य आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी संक्रमित व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला दिला गेला आहे. तसेच फ्लूमुळे येणाऱ्या फोडाला खाजवू नये. यावर योग्य उपचार म्हणजे मुलांनी विश्रांती घ्यावी, त्यांना इतरांपासून वेगळे ठेव. तसेच या फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीची भांडी, कपडे आणि इतर सामान पूर्णपणे स्वच्छ आणि सॅनिटाईज करणे आवश्यक आहे.
कोरोना सारखीच नियमावली या आजारापासून वाचण्यासाठी पाळावी लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि फेस मास्कचा वापर करावा. त्यामुळे या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.