Monkey Saves 6 Year Old Girl: कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये 9 सप्टेंबर रोजी एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला अमानुष बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. त्यातच महाराष्ट्रातील बदलापूरमध्येही शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या दोन प्रकरणांनंतर देशभरातून सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. असं असतानाच उत्तर प्रदेशमधील बागपत येथे मात्र एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न चक्क माकडांच्या एका टोळीनं हाणून पाडल्याचा आगळा-वेगळा प्रकार समोर आला आहे. छोट्या शिशूमध्ये शिकणाऱ्या या मुलीने नंतर संपूर्ण घटनाक्रम तिच्या पालकांना सांगितला. तिनेच आपल्याला माकडांनी वाचवल्याचं पालकांना सांगितलं.
बागपतमधील दौला गावामध्ये 20 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या प्रकरणामध्ये आरोपीविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आमिष दाखवून या मुलीला निर्जनस्थळी असलेल्या एका पडक्या घरात नेला. तो या ठिकाणी मुलीला निर्वस्र करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार इतक्यात त्या ठिकाणी माकडांची एक टोळी आली. या माकडांनी किंकाळून या इसमाला घाबरवलं. माकडांचं रौद्ररुप पाहून हा आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. तो त्या मुलीला तिथेच सोडून पळाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गावात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी पळून जाताना कैद झाला. काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मुलीला स्वत:बरोबर निर्जनस्थळी असलेल्या घरात नेत असल्याचंही दिसत आहे. या फुटेजवरुन पोलीस आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
नक्की वाचा >> पत्नीचे विवाहबाह्यसंबंध असले तरी..; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा दुसऱ्या गावातील रहिवाशी आहे. ही पीडित मुलगी तिच्या घरासमोरील अंगणामध्ये खेळत असताना आरोपीने तिला आमिष दाखवून तिथून नेलं. आधी हा आरोपी मुलीचा हात पकडून तिला गावातील एका धार्मिक स्थळाजवळ घेऊन गेला. त्यानंतर तो तिला निर्जनस्थळी घेऊन गेल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तू विरोध केला तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला मी मारुन टाकेन, अशी धमकी त्याने मला दिलेली असं या मुलीने पालकांना घटनाक्रम सांगताना नमूद केलं.
आरोपी मुलीचा लैंगिक छळ करण्याच्या तयारीत असतानाच त्या निर्जनस्थळी असलेल्या घराजवळ माकडांच्या टोळीने हल्ला केला. त्यांनी आरोपीला पळवून लावलं. या मुलीने घराकडे पळ काढला. तिने हा घटनाक्रम सांगितल्यानंतर कुटुंबाने पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.