काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा नाही, सूरत कोर्टाने याचिका फेटाळली

Rahul Gandhi Modi Surname Case :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून पुन्हा एकदा झटका बसला आहे.  सूरत सत्र कोर्टाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांची शिक्षा कायम राहणार असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 21, 2023, 07:57 AM IST
 काँग्रेस नेते  राहुल गांधी यांना दिलासा नाही, सूरत कोर्टाने याचिका फेटाळली title=

Rahul Gandhi Modi Surname Case : काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून पुन्हा एकदा झटका बसला आहे. मोदी आडनाव प्रकरणात सूरत कोर्टाने राहुल गांधी यांचा स्थगिती अर्ज फेटाळला आहे. सूरत सत्र कोर्टाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांची शिक्षा कायम राहणार असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. दरम्यान, सूरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सत्र कोर्टाच्या निर्णयाला ते आव्हान देणार आहेत.

राहुल गांधींच्या याचिकेवर आज सूरत कोर्टात सुनावणी झाली. मात्र, कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची शिक्षा कायम आहे. 2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं 23 मार्चला दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, राहुल यांनी याचिका फेटाळल्याने राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता राहुल गांधी हे उच्च न्यायालयात अपिल करणार आहेत.

सूरत न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आणि अपिल करण्यासाठी जामीनही कोर्टाकडून मिळाला होता. मात्र, कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी सूरत सत्र न्यायालयात अपील केले होते. आणि आता सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळली आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेसला आशा होती की, दोषी आणि शिक्षेच्या निर्णयावर स्थगिती मिळेल. त्यानंतर त्यांचे संसदेचे सदस्यत्व बहाल केले जाईल. मात्र आता सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्जच फेटाळला. त्यामुळे राहुल गांधी यांच्या पदरी निराशाच पडली आहे. गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरपी मोगेरा यांच्या न्यायालयाने राहुल गांधी यांच्या अर्जावरील निर्णय 20 एप्रिलपर्यंत राखून ठेवला होता. मात्र, त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

 राहुल गांधी यांच्या वकिलांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक म्हणजे राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देणे आणि दुसरे अपील निकाली निघेपर्यंत शिक्षेला स्थगिती देणे. राहुल गांधी यांना जामीन देताना न्यायालयाने राज्य सरकार आणि तक्रारदार पूर्णेश मोदी यांना नोटीसही बजावली होती.

राहुल यांचे संसद सदस्यत्व रद्द

राहुल गांधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केरळच्या वायनाड मतदारसंघातून खासदार झाले. यावर्षी 23 मार्च रोजी सूरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.