मुंबई : भारतात सध्या कोविड -19 च्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवला आहे. ज्यामुळे देशातील सगळ्याच राज्यांत कर्फ्यू आणि लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध लावले गेले आहेत. ज्यामुऴे लोकांना कामाव्यतिरिक्त घरा बाहेर पडण्यासाठी बंदी घातली आहे. ज्यांमुळे बरेच लोकं ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत, तसेच त्यांचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचे (RC) काम देखील करु शकत नाहीत. त्याच बरोबर अनेक राज्यांत प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO) बंद आहेत ज्यामुळे भारत सरकारने भारतीयांना थोडा दिलासा दिला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road and Transport) वाहन चालविण्याचा लायसन्स नूतनीकरण (DL) किंवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) साठी नवीन मार्गदर्शक सूचना आणल्या आहेत. सध्या दिल्लीसह काही राज्यात फेसलेस सर्विस उपलब्ध आहे. आपण ऑनलाईन आरटीओ सेवेचा लाभ कसा घेऊ शकता हे जाणून घ्या.
आपल्याला https://parivahan.gov.in/parivahan/ या अधिकृत आरटीओ वेबसाइटवर जावे लागेल.
होमपेजवर, तुम्ही लाभ घेऊ इच्छीत सेवेवर क्लिक करावे लागेल. उदाहरणार्थ: जर तुम्हाला लर्नींग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला "ड्रायव्हर / लर्नींग लायसन्स" पर्याय निवडावा लागेल.
पुढील पेजवर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल, त्या आधारे तुम्ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे की, तुम्हाला त्यासाठी RTO कार्यालयात जावे लागेल हे तपासू शकता.
नव्या नियमानुसार, लर्नींग लायसन्स मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल, अर्जापासून लायसन्स छपाईपर्यंत तुम्हाला ऑनलाईन सुविधा देण्यात येईल. याव्यतिरिक्त, वैद्यकीय प्रमाणपत्र, लर्नींग लायसन्स, वाहन चालविण्याचा परवाना आणि नूतनीकरणासाठी अर्ज करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे वापरली जाऊ शकतात.
तसेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नूतनीकरण (RC) आता 60 दिवस अगोदर केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त तात्पुरती नोंदणीची मुदतही 1 महिन्यापासून 6 महिने करण्यात आली आहे.
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेतही सरकारने बदल केले आहेत. ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता तुम्हाला आरटीओकडे जाण्याची गरज नाही. त्यासाठीचे प्रशिक्षण आता ट्यूटोरियलद्वारे घरी घेतले जाऊ शकते. ज्यामुळे याकाळात सर्व लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे सुलभ होईल.
मार्चच्या उत्तरार्धात रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हिंग लायसन्स (DL), रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC), फिटनेस प्रमाणपत्र आणि परवान्यासारख्या मोटार वाहन कागदपत्रांची वैधता 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे.
मंत्रालयाने एक परिपत्रक काढत म्हटले आहे की, संपूर्ण देशातील कोरोनाची बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता 1 फेब्रुवारी 2020 रोजीपर्यंत मुदत संपलेली कागदपत्रे येत्या 30 जून 2021 पर्यंत वैध मानली जातील.