नवी दिल्ली: #MeToo मोहिमेमुळे अडचणीत आलेले आणि ९ महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांनी ई-मेलद्वारे आपला राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने हा राजीनामा अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती 'फर्स्ट पोस्टने' दिली आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हापासून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला होता. मात्र, एम.जे. अकबर परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ, असे भाजपचे म्हणणे होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करू, असे आश्वासनही दिले होते.
या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते रविवारी सकाळीच भारतात परतले. ते विमानतळावर येताच माध्यम प्रतिनिधींनी त्यांची या आरोपांबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपण लवकरच याबाबत स्पष्टीकरण देऊ, असे सांगत तेथून काढता पाय घेतला.
#WATCH Delhi:Union Minister MJ Akbar returns to India amid accusations of sexual harassment against him, says, "there will be a statement later on." pic.twitter.com/ozI0ARBSz4
— ANI (@ANI) October 14, 2018