नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र आलेल्या विरोधीपक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी अर्ज भरला. मीरा कुमार यांच्यासोबत अर्ज भरण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह विरोधी पक्षांचे अनेक बडे नेते उपस्थित होते.
अर्ज भरण्याआधी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण केली. अर्ज भरताना एनडीएचे उमेदवार रामानाथ कोविंद यांच्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. त्याची पुनरावृत्ती दिल्लीत पहायला मिळाली.
काँग्रेससोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष,लालूंचा पक्ष राजद, ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस यांनी मीरा कुमार यांना पाठिंबा दिलाय. अर्ज भरताना त्यांच्यासोबत सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थइत होते. एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याकडे 63 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. १७ जुलैला राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक होणार आहे.