नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अर्थमंत्री अरुण जेटली, अमित शाह यांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीनंतर एक मोठी घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. दिवाळीआधी मोदी सरकार सर्वसामन्यांना गिफ्ट देऊ शकतं, अशी माहितीही सूत्रांकडून मिळते आहे.
दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पडत्या जीडीपीवर हल्ला करणा-या विरोधी पक्षावर पलटवार केले आहेत. पंतप्रधान मोदी हे ICSI च्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांनी त्यांच्या तीन वर्षातील कामांचाही पाढा वाचला. तर कॉंग्रेसच्या काळातील स्थितीही सांगितली. ते म्हणाले की, सरकारने नोटाबंदीसारखा कठिण निर्णय घेतला. आमच्या सरकारची मोठी गोष्ट म्हणजे, आम्ही कमी पैशांमध्ये अर्थव्यवस्था चालवत आहोत. यासोबतच त्यांनी जीएसटीवरही भाष्य केलं आहे. जीएसटीमध्येही आम्ही आवश्यक बदल करण्यास तयार आहोत, असं मोदी म्हणाले.
आठ नोव्हेंबर २०१६ ही तारीख इतिहासात भ्रष्टाचार मुक्तीसाठी ठवण्यात आलेल्या पावलांसाठी ओळखली जाईल. आजही काही लोकांना निराशा पसरवण्यात मजा येते. याआधीच्या सरकारमध्ये ८ वेळा जीडीपी ५.७ टक्क्याने खाली आला आहे. या देशाने ते दिवसही पाहिले आहेत, जेव्हा जीडीपी ०.१ टक्का होता.
- देशाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत आता इमानदारीला महत्व मिळेल. इमानदार लोकांच्या हितांची सुरक्षा केली जाईल.
- हे खरंय की, गेल्या तीन वर्षात ७.५ टक्क्यांनी वाढलेल्या जीडीपीमध्ये यावर्षी एप्रिल-जूनमध्ये घसरण झाली आहे.
- मला विश्वास द्यायचा आहे की, सरकार द्वारे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे येणा-या काही वर्षात विकासाची नवीन दिशा ठरेल.
- याआधीच्या सरकारमध्ये ६ वर्षात ८ वेळा जीडीपी ५.७ टक्क्यांहून खाली गेला आहे.
- Demonetisation नंतर Cash to GDP Ratio आता ९ टक्क्यांवर आला आहे.
- सरकार येत्या काळात आणखीही काही मोठे निर्णय घेणार आहे.