कोमल वावरकर, , झी मीडिया, मुंबई : क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो तर लोकसंख्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतात प्रदूषणाची समस्याही मोठी होत चाललेली दिसतेय. देशात सहा लाखांपेक्षा जास्त गावं आहेत आणि आजही अनेक गावांत एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे शौचालयाची... शौचालयाच्या आणि स्वच्छतेच्या अभावामुळे गावखेड्यात रोगराई पसरतात... परंतु, भारतात एक असंही गाव आहे जिथे फक्त स्वच्छतेला महत्त्व दिलं जातं... हे गाव म्हणजे मेघालय राज्यातील 'मावलीनॉन्ग'... 'आशियातील सर्वात स्वच्छ गाव' म्हणून या गावाची ख्याती आहे.
मावलीनॉन्ग हे गाव भारताच्या उत्तर-पूर्व भागातल्या मेघालय या राज्यात 'खासी हिल्स' या जिल्ह्यात आहे. भारत - बांग्लादेश सीमारेषेपासून अगदी जवळ असलेलं हे गाव स्वच्छ आणि सुंदर आहे. मावलीनॉन्ग या गावातील प्रत्येक व्यक्ती गाव स्वच्छ ठेवणे हे स्वत:चे कर्तव्य आहे, असे मानतो. या गावाला २००३ मध्ये 'डिस्कव्हर इंडिया' या मॅगझीनने 'आशियातील सर्वात स्वच्छ गाव' म्हणून घोषित केले आहे. त्यानंतर या गावाकडे आपसूकच पर्यटकांचा ओढा वाढलाय. या गावचे वातावरण अतिशय हिरवळ निसर्गरम्य असून हे गाव स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल आहे.
युरोपमधील शहरांपेक्षाही हे गाव स्वच्छ आहे. गावातल्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला बांबूच्या कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. मावलीनॉन्ग गावात सौरदिव्यांचा वापर केला जातो. गावातील झाडांची वाळलेली पाने आणि फुले यांना एका खड्यात पुरुन त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. कंपोस्ट खताचा वापर गावकरी शेतीसाठी आणि घराजवळ असणाऱ्या झाडांसाठी खत म्हणून करतात. त्यामुळे झाडांची योग्य ती वाढ होते.
या गावातील गावकरी कधी उरलेले अन्न फेकत नाही. उरलेले अन्न गावकरी गावाबाहेरील डुकरांना खाण्यास टाकतात. या गावात प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या वस्तूवर बंदी आहे. गावात प्रत्येक घरी शौचालय आहे. गावकरी ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा ठेवतात, ज्यामुळे घाण पसरत नाही.
या गावामधील रस्ते स्वच्छ आणि सुंदर आहेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपाण करण्याला या गावात बंदी आहे. या गावात एक कडक शिस्त आहे. ती म्हणजे गावकऱ्यांकडून सकाळ - संध्याकाळ गावाची स्वच्छता एकत्रितरित्या पार पडते.
मावलीनॉन्ग हे गाव स्वच्छ असल्याने या गावाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात. पर्यटनाद्वारे येथील गावकऱ्यांना रोजगाराचे माध्यम उपल्बध झाले आहे. पर्यटकांना या गावात दाखल होण्यासाठी शुल्क भरावे लागते. गावाला भेट देण्यासाठी केवळ भारतीय पर्यटकच नाही तर परदेशातूनही अनेक पर्यटक येतात.
'नोंगक्रेम नृत्य महोत्सवा'च्या वेळी अनेक पर्यटक या गावाला भेट देण्यासाठी दाखल होतात. 'निसर्गनिर्मित पूल' ही इथल्या गावांची आणि जंगलांची आणखी एक ओळख... या गावातील जंगले ही, पाहण्यासारखी आहे उंच धबधबा आणि पर्वत डोंगर आणि स्वच्छतेमुळे गाव पर्यटकांना फार आवडते. मावलीनॉन्ग गावामधील 'लिविंग रूट' पुलांची युनेस्कोने 'जागतिक वारसा' स्थळांमध्ये नोंद केली आहे.
मावलीनॉन्ग या गावातील 'स्काय व्ह्यू' हे आणखीन एक आकर्षण... सुविधाजनक असलेलं हे ठिकाण लोकप्रिय आहे. मावलीनॉन्ग गावातील हा बांबूपासून बनलेला टॉवर ८५ फूट उंच आहे. 'स्काय व्ह्यू'च्या शीर्षस्थानी पोहोचल्यानंतर अनेक पर्यटकांना श्वास घेणंही कठीण जातं. मावलीनॉन्ग गावातील १०० वर्षांहून जुनी संरचना असलेले 'एपिफेनी चर्च'लाही इथं येणारे पर्यटक भेट देतात.
हे गाव इंडो-बांग्लादेशाच्या सीमेवर आहे, म्हणूनच बांग्लादेशचा परिसरही इथून दिसू शकतो. मावलीनॉन्ग या शांतीप्रिय गावच्या शांततेचा भंग केवळ इथल्या धबधब्याच्या आवाजानेच होते... या गावातील परिसर हिरवागार गवताच्या, लाल आणि नारंगी फुलांच्या फांद्यांसह पर्यटकांना सुखद आणि आल्हाददायक वाटतो म्हणून या गावाला अनेक पर्यटक भेट देतात.
मावलीनॉन्ग या गावातल्या गावकऱ्यांचे मुख्य अन्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, भात आणि मासे आहे. इथल्या उल्हासित वातावरणात साधे खाद्यपदार्थ चविष्ठ लागतात.
रस्ते मार्ग : मावलीनॉन्गकडे जाणारे रस्ते चांगल्या स्थितीत आहेत. चेरापुंजी आणि शिलाँगसारख्या गावांमध्ये आणि आसपासच्या भागांतून इथे जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे.
हवाई मार्ग : शिलाँग विमानतळापासून मावलीनॉन्ग गाव ७८ किलोमीटरवर आहे. कोलकाता ते शिलाँग थेट फ्लाइट उपलब्ध आहेत. परंतु, तुम्ही दिल्लीसारख्या शहरांमधून येत असाल तर तुम्हाला कनेक्टिंग फ्लाइट घ्यावं लागेल. विमानतळावर पोहोचल्यावर, मावलीनॉन्गपर्यंत पोहचण्यासाठी टॅक्सी किंवा बसने प्रवास करता येईल.
रेल्वे मार्ग : मावलीनॉन्गसाठी सर्वात जवळचं रेल्वे स्थानक म्हणजे गुवाहाटी... गुवाहाटीपासून मावलीनॉन्ग १७२ किमी अंतरावर आहे. स्टेशनपासून गावापर्यंत पोहचण्यासाठी बस सेवा किंवा टॅक्सी सेवेचा आधार घेऊ शकाल.