जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये शनिवारी रात्री दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले. यामध्ये कॅप्टन बृजेश थापा, नायक डी राजेश, जवान बिजेंद्र आणि अजय यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा एक जवानही या चकमकीत शहीद झाला. 26 वर्षीय लष्कर अधिकारी बृजेश थापा दार्जिलिंगच्या गिंग बाजार येथे वास्तव्यास होते. त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी लष्कराच्या माध्यमातून देशसेवा केली आहे. बृजेशचे वडील कर्नल पदावर निवृत्त झाले आहेत.
बृजेश थापा आपलं प्रशक्षिण पूर्ण झाल्यानंतर 2019 मध्ये लष्करात दाखल झाले होते. 10 राष्ट्रीय रायफल्समध्ये दोन वर्षं त्यांनी कर्तव्य बजावलं. बृजेश थापा शहीद झाल्याची माहिती मिळाली तेव्हा दार्जिलिंगमध्ये शोकाकुळ वातावरण झालं. बृजेश थापा यांच्या आई निलिमा थापा यांनी 'आज तक'शी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. "15 जानेवारीला माझ्या मुलाचा वाढदिवस होता. 15 जानेवारीलाच लष्कर दिन असतो. माझा मुलगा लष्करासाठी कर्तव्य बजावताना शहीद झाला आहे. तो लष्करात असल्याचा अभिमान होता. त्याला लष्कर आवडत होतं. त्याच्या वडिलांनी त्याला नौदलात जा, सैन्यात फार कढीण असतं असं सांगितलं होतं. पण त्याला आर्मीतच जायचं होतं".
यावेळी त्यांनी आपल्या मुलासोबत झालेल्या अखेरच्या भेटीबद्दलही सांगितलं. "बृजेश मार्चमध्ये घरी आला होता. या महिन्यात तो येणार होता. तो नेहमी आनंदी असायचा. रविवारी माझं त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. सरकार नेहमीच दहशतवादाला रोखण्याचा प्रयत्न करते. जवान तर कधी घाबरत नाहीत. हा त्यांच्या कामाचाच भाग आहे. माझा मुलगा 26 वर्षांचा होता. त्याला देशासाठी काहीतरी करायचं होतं. त्याला साधं जेवण आवडायचं. आधी हलवा खायचा, पण नंतर मी जाड होईन या भितीने गोड खाणं सोडलं. माझा मुलगा असला म्हणून काय झालं, कोणाला तरी सीमेवर जावं लागणार. अन्यथा शत्रूंशी कोण लढणार?".
बृजेश थापा यांचे वडील निवृत्त कर्नल भुवनेश कुमार यांनी सांगितलं की, "रविवारी रात्री 9.30 वाजता माझं त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. एका दिवसापूर्वी तो मुसळधार पाऊस असल्याने डोंगरावरुन खाली बेसवर आला होता. तो म्हणत होती की, तिथे फार पाऊस आहे. आज रात्री पुन्हा 7 तासांची चढाई करुन वर जायचं आहे. तिथे रस्ता नाहीये. पार्टी घेऊन जंगलाच्या रस्त्याने वर जायचं आहे. तो5 वर्ष सर्व्हिसमध्ये होता. मी तुमच्यासारखाच होणार असं मला नेहमी सांगायचा. जेव्हा मी लष्कराच्या गा़डीत पुढे आणि तो मागे बसायचा तेव्हा मी एक दिवस अधिकारी होणार असं मला सांगायचा. नंतर मी पण पुढच्या सीटवर बसेन".
कर्नल भुवनेश थापा म्हणाले, 'सुरुवातीपासूनच त्याची सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. त्याने आपले काम चोख केले. त्याने बी.टेक केलं होतं. मी त्याला म्हणालो की दुसरीकडे कुठेतरी नोकरी मिळव, पण तो नाही म्हणाला. त्याला सैन्यात भरती व्हायचं होतं. . त्याला माझे आर्मीचे जॅकेट घालून फिरण्याची आवड होती".
जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी घटनांबाबत कर्नल थापा म्हणाले, 'प्रत्येक दहशतवादी शोधणं कठीण आहे. मीदेखील सैन्यात राहिलो आहे, जंगलात काम करणे सोपं नाही. आम्ही आमच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करणार आहोत. गावकरी तिकडे वाट पाहत आहेत".