राजौरीमध्ये मेजर चित्रेश बिष्ट शहीद, पुढच्या महिन्यात होतं लग्न

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेवर सुरुंगाला निष्क्रिय करत असताना स्फोट झाला.

Updated: Feb 17, 2019, 04:49 PM IST
राजौरीमध्ये मेजर चित्रेश बिष्ट शहीद, पुढच्या महिन्यात होतं लग्न title=

देहरादून : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेवर सुरुंगाला निष्क्रिय करत असताना स्फोट झाला. या स्फोटामध्ये मेजर चित्रेश बिष्ट शहीद झाले. चित्रेश बिष्ट यांचं पुढच्याच महिन्यामध्ये लग्न होणार होतं. चित्रेश बिष्ट यांचं पार्थिव रविवारी देहरादूनला आणण्यात आलं. नौशेरा सेट्करमध्ये शनिवारी सुरुंग लावण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर, हा सुरुंग निष्क्रिय करण्यासाठी गेलेल्या पथकाचं नेतृत्व बिष्ट करत होते.

या पथकानं एक सुरुंग यशस्वीरित्या निष्क्रिय केला, पण दुसरा सुरुंग निष्क्रिय करत असताना त्याचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये बिष्ट गंभीर जखमी झाले, यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मेजर चित्रेश बिष्ट शहीद झाल्याचं कळल्यावर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

मेजर चित्रेश बिष्ट यांचं लग्न ठरलं होतं. २८ फेब्रुवारीला ते लग्नासाठी घरी परतणार होते. ७ मार्चला मेजर चित्रेश बिष्ट यांचं लग्न होणार होतं. मेजर चित्रेश यांचे वडिल सेवानिवृत्त पोलीस आणि आई गृहिणी आहेत. बिष्ट कुटुंब अल्मोडा जिल्ह्याच्या राणीखेतचे रहिवासी आहेत.

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी बिष्ट यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत ट्विट केलं. 'मेजर बिष्ट यांनी देशाच्या सेवेसाठी दिलेल्या बलिदानाला सलाम करतो. दु:खाच्या या प्रसंगी संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांसोबत उभा आहे,' असं रावत या ट्विटमध्ये म्हणाले.