पणजी : दीर्घ आजाराने १७ मार्च २०१९ ला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं. एक राजकारणी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून मनोहर पर्रिकर यांची नेहमी आठवण काढली जाईल. अतिशय साधेपणा ही त्यांनी वेगळी ओळख होती. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव आज अनंतात विलीन होईल. मनोहर पर्रिकर आयआयटी मुंबई येथून मॅकेनिकल इंजिनियरिंग केलं होतं. त्यानंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी संघात जाणं सुरु केलं. मनोहर पर्रिकर हे साधा शर्ट आणि साधी पँटमध्ये नेहमी असाये.
मनोहर पर्रिकर हे अनेकदा पब्लिक ट्रांसपोर्टनेच प्रवास करायचे. विमानातून प्रवास करताना देखील ते नेहमी इकोनॉमी क्लासमधूनच जायचे. महत्त्वाचं म्हणजे मंत्री असताना देखील ते त्यांचं मोबाईल बिल आणि वीज बिल देखील स्वतःच भरायचे. मनोहर पर्रिकर आपल्या मुलाच्या लग्नात देखील हाफ शर्ट, पँट आणि सँडलमध्ये दिसले होते. मुख्यमंत्री असताना ते सरकारी कारच्या ऐवजी स्कूटरचा वापर करायचे. मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी कधी मुख्यमंत्र्यांचा सरकारी बंगला वापरला नाही.
मनोहर पर्रिकर रोज १६ ते १८ तास काम करायचे. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं की, सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान ते रात्रभर जागे होते आणि क्षणाक्षणाची माहिती घेत होते. २०१४ ते २०१७ पर्यंत संरक्षणमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात भारत आणि फ्रांसमध्ये लढाऊ विमान राफेलचा करार झाला. याशिवाय लष्कराचं आधुनिकीकरण, वन रँक वन पेंशन योजना देखील त्यांच्याच काळात लागू झाली.