'मुख्यमंत्रीपदावर राहण्यासाठी मनोहर पर्रिकर मोदींना ब्लॅकमेल करतायत'

पर्रिकर हे एखाद्या जळवेसारखं मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून बसलेत.

Updated: Dec 22, 2018, 11:14 AM IST
'मुख्यमंत्रीपदावर राहण्यासाठी मनोहर पर्रिकर मोदींना ब्लॅकमेल करतायत' title=

पणजी: मनोहर पर्रिकर यांच्याकडे राफेल कराराबाबतची महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावरून दूर सारण्याचे धाडस करू शकत नाहीत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते जयपाल रेड्डी यांनी केला. ते शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रेड्डी यांनी म्हटले की, भाजपकडून नैतिकतेच्या गप्पा मारल्या जातात. मात्र, मनोहर पर्रिकरांच्यावेळी भाजपची ही नैतिकता कुठे जाते? पर्रिकर हे एखाद्या जळवेसारखं मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून बसलेत. मला याचे कारण माहिती आहे. भारताने फ्रान्सशी राफेल करार केला तेव्हा मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री होते. त्यामुळे त्यांच्याकडे या कराराबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आहे. याचीच भीती दाखवून पर्रिकरांनी आपले मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवलेय. मोदी त्यांना काहीही करु शकत नाहीत, असे रेड्डी यांनी म्हटले. रेड्डी यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

आजारपणामुळे पर्रिकरांना मुख्यमंत्रिपदावरून हटवता येणार नाही- न्यायालय

पर्रिकर गेल्या काही महिन्यांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. यामुळे त्यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. मात्र, असे असूनही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले आहे. गंभीर आजारी स्थितीतही पर्रिकर यांना काम करायला लावून त्याची जाहिरात केल्याबद्दल भाजपवर बरीच टीका होत आहे.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या एका दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  नाकात नळी असूनही पर्रिकर जुवारी आणि मांडवी उड्डाणपूल प्रकल्पाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी आले होते. यासाठी त्यांनी पर्वरी ते मेर्सिस असा सहा किलोमीटरच प्रवासही केला. याठिकाणी आल्यानंतर त्यांनी बांधकामासंबंधी अधिकारी व अभियंत्यांशी चर्चाही केली. 

मानलं बुवा! आजारपणातही मनोहर पर्रिकर ऑन ड्युटी

मनोहर पर्रिकर उपचारांसाठी अमेरिकेत गेले असताना गोव्यातील राजकीय परिस्थिती कमालीची अस्थिर झाली होती. अखेर पर्रिकरांनी भारतात आल्यानंतर गोव्याच्या कारभाराची सूत्रे पुन्हा हातात घेतली. मध्यंतरीच्या काळात भाजपने काँग्रेसच्या सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपते या दोन आमदारांना गळाला लावले. त्यामुळे भाजपचे सरकार मजबूत झाले होते. मात्र, यानंतरही काँग्रेसने मुख्यमंत्री घेत असलेल्या प्रत्येक बैठकीचा पुरावा म्हणून व्हीडिओ प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून मुख्यमंत्री कार्यालयाकडून पर्रिकर यांच्या कार्यक्रमाची छायाचित्रे ट्विट केली जात आहेत.