कांगरा: सध्या लॉकडाऊनमुळे अनेक गरीब कुटुंबांना पैशांची प्रचंड चणचण जाणवत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत आपल्या मुलीचे शिक्षण थांबू नये, यासाठी एका पित्याने घरातली गाय विकून टाकल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगरा जिल्ह्यात राहणाऱ्या कुलदीप कुमार यांच्यावर ही दुर्दैवी वेळ ओढावली. लॉकडाऊनमुळे सध्या कुलदीप यांची मुलगी ऑनलाईन अभ्यासाचे धडे गिरवत आहे.
त्यासाठी कुलदीप पवार यांनी मुलीला अडीच महिन्यांपूर्वी स्मार्टफोन आणून दिला होता. परंतु, मोबाईल विकत घेण्यासाठी कुलदीप कुमार यांनी एका व्यक्तीकडून सहा हजार रुपये उधार घेतले होते. मात्र, काही दिवसांनंतर या व्यक्तीने कुलदीप यांच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. अखेर पैसे नसल्यामुळे कुलदीप कुमार यांनी त्यांच्याकडील गाय विकून हे कर्ज फेडले.
ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. सरकारी अधिकाऱ्यांनी कुलदीप कुमार यांना गाय परत मिळवून देण्याची तयारी दर्शविली. मात्र, कुलदीप यांनी ही मदत नाकारली. त्याऐवजी आपल्या घराची डागडुजी करुन द्यावी. तसेच केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत आपला दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांमध्ये समावेश केला जावा, अशी विनवणी कुलदीप कुमार यांनी केली आहे.
दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कुलदीप कुमार याने गाय ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे तिला विकून टाकले. कुलदीप कुमार यांच्याकडे अजूनही दोन गायी आहेत. त्यामुळे त्यांना आणखी एका गायीची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने कुलदीप कुमार यांना मदत करायची तयारी दर्शविली आहे.