Rs 2000 Notes: 2 हजारांच्या नोटा बदलून घेताना Fake Notes मधून SBI ला गंडवलं! 2.85 कोटी जमा करताना...

Rs 2000 Note Exchange: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशानुसार 23 मेपासून सर्वच बँकांमध्ये नागरिकांनी 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जात आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: May 26, 2023, 01:36 PM IST
Rs 2000 Notes: 2 हजारांच्या नोटा बदलून घेताना Fake Notes मधून SBI ला गंडवलं! 2.85 कोटी जमा करताना... title=
Rs 2000 Notes

Rs 2000 Note Exchange: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यासंदर्भातील पत्रक जारी केलं. 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजारांच्या नोटा जवळच्या बँकेतून बदलून घेण्याचं आवाहन आरबीआयकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. 23 मेपासून नोटा बदलून देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आग्रा येथे 2 हजारांच्या नोटा बदलून घेताना एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खोट्या 2 हजाराच्या नोटा बदलण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. 

नक्की घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेच्या आग्रा येथील शाखेमध्ये 2.85 कोटी रुपये जमा करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने 2 हजारांच्या खोट्या नोटाही बदलून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये रकाबगंज पोलीस स्टेशनमध्ये बँकेच्या मॅनेजरने लेखी तक्रार दाखल केल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामधील आरोपीचं नाव हर्षल बन्सल असं आहे. हर्षलच्या वडिलांचं कमला नगर येथे दुकान आहे. "आयपीसी कलम 489-सी (खोट्या चलनी नोटा बाळगणे) अंतर्गत या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीला अद्याप अटक झालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत," अशी माहिती स्थानकप्रमुख प्रदीप कुमार यांनी दिली.

एकूण 13 नोटा सापडल्या

"बँक मॅनेजर अशोक कदम यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरबीआयच्या निर्देशानुसार एखाद्या व्यक्तीकडे 5 हून अधिक खोट्या नोटा आढळल्यास त्यासंदर्भात तक्रार दाखल करता येते. या प्रकरणामध्ये 2 हजारांच्या 13 खोट्या नोटा आढळून आल्या आहेत. या नोटांचे मूल्य 26 हजार रुपये इतकं आहे. मोठ्या प्रमाणात पैसे बँकेमध्ये भरताना त्यामध्ये या खोट्या नोटांचा समावेश आरोपीने केला होता," असं तक्रारीत म्हटल्याची माहिती स्टेशन प्रमुखांनी दिली. हर्षल बन्सल एसबीआयच्या चिपितोला येथील शाखेमध्येही पैसे भरण्यासाठी गेला होता. येथे हर्षलने 2 हजारांच्या 3 खोट्या नोटा जमा केल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच एकूण 32 हजारांच्या खोट्या नोटा हर्षलने बँकेत भरल्या. 

नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलून घ्या

रिझर्व्ह बँकेने 2 हजारांच्या नोटा अधिकृत चलन म्हणून कायम असतील असं सांगतानाच या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलून घ्याव्यात असंही सांगितलं आहे. त्यामुळेच 2 हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तर 2 हजारांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचं चित्र दिसत आहे.